महाराष्ट्र केसरी पै. शिवराज राक्षे व हरियाणाचा पै. शाॅन्टीकुमार यांची शेवटची रोमहर्षक, चितपट कुस्ती ; लोणी काळभोर…
लोणी काळभोर येथील ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथाची वार्षिक यात्रा संपन्न...

पुणे : लोणी काळभोर येथील ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथाची वार्षिक यात्रा संपन्न झाली. दुपारनंतर झालेल्या या आखाड्यात महाराष्ट्र केसरी पै. शिवराज राक्षे व हरियाणाचा पै. शाॅन्टीकुमार यांची शेवटची रोमहर्षक, चितपट कुस्ती त्या बरोबरच आखाड्यात अनेक महाराष्ट्र केसरी, अर्जुन पुरस्कार विजेते, उपमहाराष्ट्र केसरी, शिवछत्रपती पुरस्कार विजेते अशा पैलवान उपस्थित होते.
संयोजकांनी केलेले आखाड्याचे सुरेख नियोजन, ६१ चितपट कुस्त्यांना तब्बल ३० लाख रुपयांची रोख बक्षिसे, प्रेक्षकांना व्यवस्थित कुस्त्या पहाता याव्या म्हणून केलेली बैठक व्यवस्था व डिजिटल स्क्रीनची सोय तसेच हजारो कुस्तीप्रेमी प्रेक्षकांची उपस्थिती त्यामुळे रात्री साडे दहापर्यंत चाललेला निकाली कुस्त्यांचा जंगी आखाडा हे यावर्षीच्या लोणी काळभोर येथील श्रीमंत अंबरनाथ यात्रेचे वैशिष्ट्य ठरले.
सन २००१ सालचे महाराष्ट्र केसरी पै राहुल काळभोर व त्यांचे सहकारी, काळभैरवनाथ अंबरनाथ देवस्थान ट्रस्ट, स्थानिक गावकरी यांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळे प्रेक्षकांना चांगल्या कुस्त्या बघण्याचा आनंद मिळाला. संयोजकांनी केलेले चोख, सुंदर नियोजन, त्याला गावकर्यांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे आखाडा अतिशय सुरेख व देखणा झाला. राज्याच्या कानाकोपर्यातून आलेल्या मल्लांनी व कुस्ती शौकीनांनीही आखाड्याच्या चांगल्या नियोजनाबद्दल संयोजकांचे कौतुक केले.
दुपारी गावकरी वाजत गाजत मिरवणुकीने आखाड्यात आल्यानंतर कुस्ती आखाड्याला सुरुवात झाली. सुरुवातीला छोट्या छोट्या कुस्त्या लावण्यात आल्या. त्या नंतर निकाली ६१ कुस्त्यांना सुरुवात करण्यात आली.
सर्वात मोठी व शेवटची २ लाख २१ हजार इनामाची कुस्ती महाराष्ट्र केसरी पै शिवराज राक्षे व हरियाणाचा पै योगेश पवार यांच्या कुस्तीत शिवराज राक्षेने विजय मिळवला.
दुसरी २ लाख रुपयांची आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाचा मल्ल, उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड याने हरियाणा केसरी विशाल भोंदू याला अस्मान दाखवले.
दिड लाख रुपयांची तिसऱ्या क्रमांकावरील कुस्तीमध्ये कर्जत (जामखेड) येथील स्पर्धेचा विजेता, महाराष्ट्र केसरी वेताळ दादा शेळके याने इराणचा अली इराणी याचा पराभव करून जिंकली.
कुस्त्यांच्या या जंगी आखाड्यात निकाली कुस्त्यांसाठी उपस्थित प्रेक्षकांचे व गावचे मिळून एकूण सुमारे रोख ३० लाख रुपये विजेत्या मल्लांना बक्षिस म्हणून देण्यात आले. प्रेक्षकांना कुस्ती व्यवस्थित दिसावी म्हणून डिजिटल स्क्रीनची सोय करण्यात आली होती. त्यामुळे निवांत बसून प्रेक्षकांनी कुस्त्यांचा आनंद घेतला. तसेच यूट्युबवरही या आखाडय़ाचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. त्यामुळे अनेक प्रेक्षकांनी घरी बसूनही ऑनलाईन कुस्ती पाहण्याचा आनंद लुटला.




