वडील रागावले याचा राग मनात धरून सख्ख्या बहिणी घरातून निघून गेल्याची धक्कादायक घटना ; २४ तासांच्या आत मुलींचा शोध लावून पालकाच्या स्वाधीन…
लोणी काळभोर पोलिसांनी कामगिरीचे सर्वत्र कौतुक...

पुणे : लोणी काळभोर जत्रेतुन ऊशीरा आल्या या कारणांवरून वडील रागावले याचा राग मनात धरून सख्ख्या बहिणी घरातून निघून गेल्याची धक्कादायक घटना घडली होती.
या प्रकरणाचा पोलिसांनी कौशल्यपुर्वक तपास करून २४ तासांच्या आत मुलींचा शोध लावून त्यांना त्यांच्या पालकांकडे सुखरूप सुपूर्त केले आहे. लोणी काळभोर पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कदमवाकवस्ती येथील एका ३९ वर्षीय विवाहितेला दोन मुली आहेत. त्यातील मोठी १८ वर्षाची असून तिने १२ वीचे शिक्षण पूर्ण केले आहे. ती सध्या घरीच असते. तर १७ वर्षीय लहान मुलगी लोणी काळभोर परिसरातील एका शाळेत इयत्ता अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी लोणी काळभोर येथील ग्रामदैवत श्री अंबरनाथ देवाची मोठी यात्रा भरते. ही यात्रा पाहण्यासाठी या दोन बहिणी शनिवार (१२ एप्रिल) रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या गेल्या होत्या. वडिलांनी यात्रेमध्ये जास्त वेळ न थांबता एका तासामध्ये घरी येण्यास सांगितले होते. यात्रा पाहून त्या दोघी घरी रात्री साडेनऊ वाजता पोहोचल्या. मुली उशिरा आल्याने मुलींचे वडील त्यांच्यावर रागावले. त्यानंतर सर्वांनी रात्री एकत्र जेवण केले आणि मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास सर्वजन झोपी गेले.
रविवार (१३ एप्रिल) रोजी सकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास आई नेहमीप्रमाणे उठल्या. तेव्हा दोन्ही मुली दिसुन आल्या नाहीत. त्यांनी मुलींचा आजुबाजुसह परीसरात शोध घेतला परंतु त्या दोघी मिळून आल्या नाहीत. त्यानंतर त्यांनी त्वरित लोणी काळभोर पोलीस ठाणे गाठले. आणि मुलींच्या अल्पवयाचा फायदा घेवुन कोणीतरी अनोळखी इसमाने त्यांना फुस लावुन पळवून नेले. अशी तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के व त्याच्या सहकाऱ्यांचे एक पथक तयार केले. त्यानंतर सदर गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना, पोलिसांना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे दोघी मुली या अक्कलकोट येथे आहेत. तसेच मुलींना कोणी पळवून नेले नाही तर वडील रागावल्याने घरातून निघून गेल्या आहेत. अशी माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अक्कलकोट पोलिसांच्या मदतीने दोन्ही मुलींना सोमवार (१४ एप्रिल) रोजी ताब्यात घेतले. दोन्ही मुलींना सुखरूप त्यांच्या पालकांकडे सुपूर्त केले. पोलिसांनी कौशल्यपूर्वक तपास करून अवघ्या २४ तासाच्या आत त्यांच्या पालकांकडे सुखरूप सुपूर्त केले आहे.
लोणी काळभोर पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे…
ही उल्लेखनीय कामगिरी पुणे शहर पोलीस उप आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के, रत्नदीप बिराजदार, पोलीस अंमलदार अमोल जाधव व त्याच्या सहकाऱ्यांनी केली आहे.



