११ वीची प्रवेशप्रक्रीया पुन्हा नव्याने सुरू; शेवटची तारीख आणि फार्म कसा भरायचा? सविस्तर वाचा…

संपादक सुनिल थोरात
पुणे : २१ मे पासून घोषित करण्यात आली होती, परंतु वेबसाईट क्रॅश झाल्याने प्रवेश प्रक्रिया थांबवण्यात आली होती, आज २६ मे २०२५ पासून पुन्हा नव्याने अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
या काळात विद्यार्थ्यांना फार्म भरुन प्रवेशासाठी आवश्यक गोष्टी करणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी प्रथम वर्ष कनिष्ठ महाविद्यालय इयत्ता ११ वीची प्रवेश प्रक्रिया आज सकाळी ११ वाजता सुरू झाली आहे. त्यामुळे दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे.
कधीपासून कधीपर्यंत करता येईल अर्ज-नोंदणी…
या शैक्षणिक वर्षासाठी अकरावी प्रवेशासाठी नोंदणीप्रक्रिया आज नव्याने म्हणजेच २६ मे पासून सुरु झाली आहे. विद्यार्थी आपली नोंदणी ३ जून २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत करु शकतील. यानंतर अर्ज नोंदणी प्रक्रिया बंद होईल. विद्यार्थी या वेळेत ऑनलाइन नोंदणी करू शकतात आणि अर्ज भरू शकतात, तसेच इच्छित कनिष्ठ महाविद्यालयांची यादी देखील देऊ शकतात.
अर्जासाठी वेबसाईट अन् महाविद्यालयाची निवड…
प्राप्त माहितीनुसार, प्रत्येक अर्जदाराला पसंती यादीचा भाग म्हणून किमान एक कनिष्ठ महाविद्यालय आणि जास्तीत जास्त दहा महाविद्यालये निवडावी लागतील. विद्यार्थ्यांना mahafyjcadmissions.in या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करता येईल आणि इतर योग्य माहिती मिळणार आहे.
अकरावीसाठी किती कॉलेज किती जागा घ्या जाणून…
अकरावी प्रवेशासाठी यंदा महाराष्ट्रातील ९,२८१ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयात एकूण २०,४३,२५४ जागा यामध्ये विज्ञान शाखेत ८,५२,२०६ जागा, वाणिज्य शाखेत ५,४०,३१२ जागा आणि कला शाखेत६,५०,६८२ जागा आहेत.
अकरावीला प्रवेश घेण्यासाठी ‘या’ तारखा लक्षात ठेवणे गरजेचे…
अकरावी प्रवेशासाठी नोंदणी वेळ: २६ मे ते ३ जून २०२५
तात्पुरती गुणवत्ता यादी : ५ जून सकाळी ११ वाजता जाहीर होईल.
आक्षेप आणि दुरुस्ती आणि विनंती वेळ : ६ जून ते ७ जून
अंतिम गुणवत्ता यादी : ८ जून सायंकाळी ४ जाहीर होणार आहे.
कॉलेज स्तरावर अल्पसंख्याक, कोटा, इन-हाऊस कोटा, व्यवस्थापन कोट्यासाठी शून्य फेरीचा प्रवेश ९ ते ११ जून दरम्यान केला जाईल.
गुणवत्ता यादीनुसार, वाटप झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयांची यादी : १० जूनला सकाळी १० वाजता जाहीर होईल. यानंतर विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागणार आहे.
अकरावी प्रवेशासाठी अर्ज कसा करावा?
सर्वप्रथम महाराष्ट्र इयत्ता ११ वी प्रवेश २०२५ साठी अधिकृत वेबसाइट https://mahafyjcadmissions.in/ ला भेट द्या.
होम स्क्रीनवरील नोंदणी लिंकवर क्लिक करा.
पसंतीचे महाविद्यालय निवडा
सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि विनंती केलेली माहिती भरा
अधिकृत पोर्टलवर गुणवत्ता यादी आणि महाविद्यालयीन वाटपाचा मागोवा घ्या.
फॉर्म भरायला अडचण आली तर खालील नंबर वर संपर्क करा.
जर तुम्हाला प्रवेश प्रक्रियेत काही अडचण आली, अथवा फॉर्म अपलोड झाला नाही किंवा तांत्रिक समस्या आल्या तर त्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाने 7669100257 किंवा 18003132164 या हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. हे क्रमांक सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत सुरू राहणार आहेत.



