टेम्पो व दुचाकीच्या अपघातात, दुचाकीस्वार जागीच मृत्यू… कदमवाकवस्ती…

संपादक सुनिल थोरात
पुणे (हवेली) : हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील वाकवस्ती परिसरात असलेल्या जगदंबा मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलजवळ पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर टेम्पो व दुचाकीचा अपघात झाला असून यामध्ये दुचाकीस्वार जागीच मृत्यूमुखी पडला असल्याची घटना बुधवार (४जून) रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
या अपघातात सुरेश विठ्ठल कांबळे (वय ३३, रा. पांढरे मळा, वागले निवास, तुकाई मंदिराजवळ, कदमवाक वस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे) यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी सुरेशचे वडील विठ्ठल लक्ष्मण कांबळे (वय ६३) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून टेम्पो चालक एकनाथ नवनाथ चोरमले (वय २३, रा. गाडमोडी, खामगाव, ता. दौंड, जि. पुणे) यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश कांबळे हे घोरपडी रेल्वे स्टेशन येथे खाजगी कामगार म्हणून काम करतात. ते रात्रपाळीसाठी नेहमीप्रमाणे बुधवारी दुचाकीवरून चालले होते. ते पुणे-सोलापूर महामार्गावरून पुण्याकडे जात असताना, त्यांची दुचाकी जगदंबा मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलजवळ आली असता सोलापूरकडून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोने दुचाकीस मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात सुरेश कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला. टेम्पो चालक एकनाथ चोरमले याच्यावर मोटार वाहन कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के करीत आहेत.



