कामाचे ठिकाण सोडून घोळक्याने कारवाई पडली महागात, वाहतूक शाखेतील तीन पोलीसांचे निलंबित…
पोलीस हवालदार संतोष चंद्रकांत यादव, बालाजी विठ्ठल पवार, मोनिका प्रवीण करंजकर अशी निलंबित करण्यात आलेल्या वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांची नावे...

संपादक सुनिल थोरात
पुणे : वाहतूक नियमनासाठी नेमून दिलेले चौक सोडून दुसऱ्या चौकात कारवाई करणाऱ्या वाहतूक शाखेतील तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी दिले. निलंबित करण्यात आलेले तीन पोलीस कर्मचारी खडक वाहतूक विभागातील आहेत.
पोलीस हवालदार संतोष चंद्रकांत यादव, बालाजी विठ्ठल पवार, मोनिका प्रवीण करंजकर अशी निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. वाहतूक नियमनासाठी वाहतूक विभागातील प्रत्येक कर्मचाऱ्याला हद्दीतील चौक आणि प्रमुख रस्त्यावर नेमणूक केली जाते. चौकातील वाहतूक नियमन ही कर्मचाऱ्याची जबाबदारी असते. मात्र, अनेक कर्मचारी त्यांना नेमून दिलेले चौक सोडून इतरत्र उभे राहतात. गाड्या अडवून त्यांच्याकडे वाहन परवाना, तसेच गाडीची कागदपत्रे मागून कारवाई केली जाते.
वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचारी घोळक्याने एका ठिकाणी थांबून कारवाई करतात. खडक वाहतूक विभागातील हवालदार यादव यांची १५ मे रोजी टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालय चौक, पवार यांची हिराबाग चौक, तसेच करंजकर यांची भावे चौकात नेमणूक करण्यात आली होती. प्रत्यक्षात यादव, पवार आणि करंजकर हे नेमणूक केलेले चौक सोडून पूरम चौकात आले. त्यांनी वाहनचालकांवर कारवाई सुरू केली. तिघे कर्मचारी नेमून दिलेले चौक सोडून दुसऱ्याच चौकात वाहनांवर दंडात्मक कारवाई करत असल्याचे आढळले.



