
पुणे : वैद्यकीय उपचाराच्या नावाखाली येरवडा कारागृहातून ससून रुग्णालयात दाखल होणारे कैदी, येथे आल्यानंतर कैद्यासारखेच राहतील. ते काय ‘मेडिकल टुरिझम’ करण्यासाठी ससूनमध्ये येत नाहीत. असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यावेळी म्हणाले.
ससून प्रशासनाच्या मदतीने अशा कैद्यांची माहिती घेतली जाईल. त्यासाठी कठोर उपाययोजना राबविल्या जातील, असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. केवळ अत्यावश्यक आणि वैद्यकीय गरज असल्यासच जेलमधील कैद्यांना येथे उपचार मिळावेत, अशी अपेक्षा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केली.
ससून रुग्णालयात नव्याने उभारण्यात आलेल्या पोलिस चौकीचे उद्घाटन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी स्थानिक आमदार सुनिल कांबळे, पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त पंकज देशमुख, अप्पर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त निखिल पिंगळे, उपायुक्त स्मार्तना पाटील, ससूनचे अधीक्षक यल्लप्पा जाधव, बांधकाम विभागाच्या किर्ती कुंजीर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, ससूनमध्ये उपचार घेण्याच्या नावाखाली काही कैदी दीर्घकाळ वास्तव्य करत असल्याच्या तक्रारी वेळोवेळी समोर आल्या आहेत. तर अनेक कैद्यांनी, आरोपींनी ससून रुग्णालयातून पळ काढल्याच्याही घटना घडल्या आहेत. एवढेच नाही तर गुन्हेगारांना वैद्यकीय चाचणीसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांचे सहकारी गुन्हेगार त्यांना भेटण्यासाठी ससूनच्या परिसरात येतात ‘आता या प्रकारांना आळा घालण्यासाठी ससूनमधून सुरू असलेल्या तथाकथित ‘मेडिकल टुरिझम’वर चाप बसवण्यात येईल. अत्यावश्यक गरज असेल, आणि केवळ वैद्यकीय कारणांमुळेच एखादा कैदी जेलमधून ससूनमध्ये आणला जाईल. मात्र, हा मार्ग मोकळेपणासाठी वापरता येणार नाही.
अशा प्रकारांवर सर्जिकल स्ट्राईक केली जाईल. आणि संबंधितांची उचलबांगडी केली जाईल. ससूनमधील चौकीचा चांगला फायदा होईल. रुग्णालयातील पोस्टमार्टम रिपोर्ट आणि एमएलसी रिपोर्ट संबंधित पोलिस ठाण्याला लवकरात लवकर पाठवले जातील. यामुळे वेळ वाचेल आणि कारवाई तत्काळ करता येईल. लैंगिक अत्याचारातील पिडीतांची वैद्यकीय चाचणी लवकरात लवकर होण्याच्या दृष्टीने सर्वांचे प्रयत्न असावेत. त्यांना ताटकळत ठेवता कामा नये. असे देखील पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले.
पीआय दर्जाचा अधिकारी तैनात असणार…
ससून रुग्णालयात गर्दी मोठ्या प्रमाणावर असते. अनेकदा मारहाणीचे प्रकार घडतात. या सर्व पार्श्वभूमीवर बोलताना आयुक्त म्हणाले, डॉक्टर, रुग्ण, तसेच त्यांच्या नातेवाइकांची सुरक्षितता अबाधित राहावी, यासाठी ही चौकी उपयुक्त ठरणार आहे. चौकीमध्ये लवकरच पीआय दर्जाचा अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले जातील. परिसरात शिस्तीचे वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांची भूमिका निर्णायक असेल.
मुख्य संपादक सुनिल थोरात



