जिल्हामहाराष्ट्रसामाजिक
आषाढी एकादशीचा उपवास कधी आणि कसा सोडावा? जाणून घ्या मुहूर्त, नियम आणि आहाराची पूर्ण माहिती!

सोलापूर (पंढरपूर) : जेष्ठ महिन्यातील महत्त्वाच्या एकादशींपैकी एक म्हणून आषाढी एकादशीला ओळखले जाते. आज ६ जुलै २०२५ रोजी आषाढी एकादशी साजरी केली जात आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरात दाखल झाले आहेत.
आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हटले जाते. आषाढी एकादशीनिमित्त घराघरात उपवास केला जातो. मात्र हा उपवास कधी सोडावा, तो सोडण्याची निश्चित वेळ काय याबद्दलची माहिती थोडक्यात जाणून घेणार आहोत.
हिंदू धर्मात प्रत्येक सणासह व्रत-वैकल्यांनाही महत्त्व असते. यात एकादशी, संकष्टी, प्रदोष, पौर्णिमा यांसारख्या मासिक व्रतांचा समावेश होतो. एकादशीचे व्रत भगवान विष्णूंना समर्पित आहे. दर महिन्याला दोन एकादशी असून यातील एक कृष्ण पक्षात आणि दुसरी शुक्ल पक्षात येते. अशाप्रकारे वर्षातून २४ एकादशी असतात. या २४ एकादशींपैकी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणारी आषाढी एकादशी अत्यंत खास मानली जाते. या एकादशीची करोडो वारकरी दरवर्षी वाट पाहत असतात. एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला पापांपासून मुक्ती मिळते आणि पुण्य प्राप्त होते, असे म्हटले जाते.
आषाढी एकादशीचा उपवास कधी सोडावा?
रविवारी ६ जुलैला आषाढी एकादशीचे व्रत केल्यानंतर प्रथेप्रमाणे दुसऱ्या दिवशी व्रत सोडले जाते. यंदाच्या आषाढी एकादशीच्या व्रताचे पारण म्हणजे उपवास हा सोमवारी ७ जुलै रोजी सोडावा. पंचांगानुसार सकाळी ५.२८ ते सकाळी ८.१६ ही वेळ उपवास सोडण्यासाठी अत्यंत शुभ राहील.
उपवास सोडताना काय खावे?
दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही फळे किंवा फ्रूट ज्यूस घेऊ शकता. केळी, संत्री या फळांचे सेवन करा. तसेच रात्री पाण्यात भिजवलेले ड्रायफ्रुट्स सकाळी खाणे फायदेशीर ठरते. तसेच बटाटा, भात, गहू, ज्वारी यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश करावा.
उपवासाच्या दुसऱ्या दिवशी तिखट, मसालेदार किंवा तळलेले पदार्थ खाणे टाळा. यामुळे पोटावर जास्त ताण येतो आणि त्याचा पचनावर परिणाम होऊ शकतो. यामुळे हलका आहार घ्या. आहारात रव्याचा उपमा, शिरा, तांदळाची खीर, सूप, भात, ज्वारीची भाकरी किंवा दलियाचा उपमा असे पदार्थ खाऊ शकता.
एकादशीचा उपवास सोडताना जेवणात गोड पदार्थ बनवा. तांदळाची किंवा शेवयाची खीर, शिरा असे पदार्थ बनवा. खिरीमध्ये प्रथिने आणि कर्बोदके भरपूर प्रमाणात असतात. उपवास सोडताना खीर खाल्ल्याने अशक्तपणा येत नाही. पण खीर बनवताना साखरेचा वापर कमी प्रमाणात करा. त्याऐवजी गूळ वापरा, तो आरोग्यासाठी अधिक चांगला ठरतो.
संपादक डॉ गजानन टिंगरे



