
पुणे : सुमारे तीन वर्षांच्या खंडानंतर पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पंचवार्षिक निवडणुका होणार असल्याने आतापर्यंत शांत असलेले सर्वपक्षीय कार्यकर्ते व पदाधिकारी आता पुन्हा सक्रीय झाले असल्याचे चित्र दिसत आहे.
या पार्श्वभूमीवर नुकताच जाहीर करण्यात आलेल्या जिल्हा परिषद गट व पंचायत समित्यांच्या गणांच्या नवीन रचनेवर अनेक ठिकाणी आक्षेप नोंदवले गेले आहेत. यासाठी एकूण २१७ हरकती आणि सूचना दाखल झाल्या आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया पुन्हा सुरू केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने गट व गणांची रचना तयार करून आठवडाभरापूर्वी प्रसिद्ध केली होती. त्यावर हरकती व सूचना नोंदविण्याची अंतिम मुदत २१ जुलै होती. सोमवार (२१ जुलै) रोजी संपली आहे. यामध्ये
सर्वाधिक ८७ हरकती खेड (राजगुरुनगर) तालुक्यातून आल्या असून, त्यानंतर हवेली तालुक्यातून ६२ आणि शिरूरमधून १६ हरकती प्राप्त झाल्या आहेत. तर पुरंदर तालुक्यातून फक्त १ हरकत दाखल झाली आहे.
या सर्व हरकती व सूचना २८ जुलैपर्यंत विभागीय आयुक्त कार्यालयात सादर करावयाच्या आहेत. त्यानंतर विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली यावर सुनावणी होईल. या सुनावणीनंतरच गट व गणांची अंतिम रचना निश्चित केली जाणार आहे.
पुणे जिल्हा परिषदेचे सभागृह २० मार्च २०२२ रोजी तर पंचायत समित्यांचे सभागृह १३ मार्च २०२२ रोजी बरखास्त झाले होते. त्यानंतर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली होती. गट विकास अधिकारी हे पंचायत समितीचे, तर मुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषदेचे प्रशासक म्हणून कार्य पाहत आहेत. त्र्याहत्तराव्या घटना दुरुस्तीनंतर महाराष्ट्रात पंचायत राज संस्थांवर इतका मोठा कालावधी प्रशासक राज राहिल्याची ही पहिलीच वेळ आहे.
तालुकानिहाय हरकती व सूचना खालील प्रमाणे –
खेड – ८७, हवेली – ६२, शिरूर – १६, मुळशी – १०, जुन्नर – ९, इंदापूर – ९, दौंड – ७, आंबेगाव- ५, मावळ – ५, बारामती – २, भोर, – २, वेल्हे – २, पुरंदर – १
विभागीय आयुक्तांना या सर्व हरकतींची सुनावणी पूर्ण करण्यासाठी सुमारे एक महिन्याचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे १ ऑगस्टपासून सुनावणी सुरू झाली तरी अंतिम निर्णय ऑगस्टच्या अखेरीस अपेक्षित आहे. इच्छुकांना गट व गणांच्या अंतिम रचनेची प्रतीक्षा करावी लागणार यात शंका नाही.
Editer Sunil thorat





