
पुणे (हवेली) : दिनांक ३१ जुलै २०२५ लोणी काळभोर (ढेले वस्ती) येथे केंद्र शासनाच्या कृषी विभागांतर्गत स्वयंचलित हवामान केंद्र (पर्जन्यमापक) उभारण्याच्या कामाला प्रारंभ झाला असून, आज त्या अनुषंगाने संभाव्य जागेची पाहणी करण्यात आली. या पाहणी दौऱ्यात गावच्या विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते.
या दौऱ्यात लोणी काळभोर ग्रामपंचायतचे सरपंच राहुल दत्तात्रय काळभोर, ग्रामपंचायत अधिकारी एस.एन. गवारी, ग्राम महसूल अधिकारी बाळासाहेब वनवे, कृषी सहायक नंदकुमार वीरपाटील, कोतवाल दशरथ वगरे, तसेच अभिमन्यू करे यांनी उपस्थित राहून स्थल पाहणी केली.
स्वयंचलित हवामान केंद्रामुळे परिसरातील शेतकऱ्यांना पर्जन्यमान, तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग यासारख्या महत्त्वाच्या हवामान संबंधित बाबींची माहिती त्वरित आणि अचूक स्वरूपात उपलब्ध होणार आहे. यामुळे शेतीची उत्पादकता वाढवण्यास मदत होणार असून, हवामानाशी संबंधित धोके ओळखून योग्य पूर्वतयारी करता येणार आहे.
ग्रामस्थांमध्ये या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत असून, केंद्राच्या स्थापनेनंतर शेतकऱ्यांना डिजिटल युगाशी सुसंगत माहितीचा फायदा मिळणार आहे. या हवामान केंद्रासाठी लागणारी सर्व प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Editer Sunil thorat






