राष्ट्रवादीत खळबळजनक हालचाल! माणिकराव कोकाटेंचे कृषी खाते जाण्याची शक्यता, दत्तात्रय भरणे नव्या मंत्रिपदाच्या रेषेत?

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवणाऱ्या हालचालींना सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि सरकारमध्ये गाजणाऱ्या मंत्र्यांबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले जात असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चेत आहेत मंत्री माणिकराव कोकाटे.
विधानसभेत ‘रमी’ खेळणं ठरलं महागात!
माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळाच्या अधिवेशनात मोबाईलवर ऑनलाइन रमी खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर विरोधकांनी संतप्त प्रतिक्रिया देत कोकाटे यांचा तात्काळ राजीनामा घेण्याची मागणी केली होती. या प्रकारामुळे सरकारची प्रतिमा मलीन होत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज झाल्याची माहिती आहे.
कोकाटे यांचं कृषी खाते जाण्याची शक्यता!
राजकीय दबाव आणि प्रतिमेवर होणाऱ्या परिणामाच्या पार्श्वभूमीवर, कोकाटे यांच्याकडून कृषी मंत्रालय काढून घेण्याचा निर्णय घेतला गेला असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यांच्या जागी अजित पवार यांचे निकटवर्तीय मंत्री दत्तात्रय भरणे यांना कृषी खाते दिलं जाण्याची शक्यता आहे. भरणे सध्या क्रीडा व युवक कल्याण खात्याचे मंत्री आहेत. कोकाटेंकडे आता क्रीडा व युवक कल्याण खाते दिलं जाऊ शकतं, जे तुलनेत कमी महत्त्वाचं मानलं जातं.
धनंजय मुंडेंचं पुनरागमन? लॉबिंग सुरु!
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणात अडचणीत आलेले माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी पुन्हा मंत्रिमंडळात प्रवेश मिळवण्यासाठी लॉबिंग सुरू केल्याचं सूत्रांकडून समजतं आहे. काही वेळापूर्वीच मुंडे हे सह्याद्री अतिथीगृहात दाखल झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, त्यांच्या पुनर्नियुक्तीबाबत अजून कोणताही अधिकृत निर्णय घेण्यात आलेला नाही.
संपादक डॉ गजानन टिंगरे





