“भगवा आतंकवादाचा शिक्का मारणाऱ्यांना देवच शिक्षा देईल!” ; साध्वी प्रज्ञा यांची पहिली प्रतिक्रिया
१७ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता ; समीर कुलकर्णी कोर्टात अश्रूंना आवरू शकले नाहीत...

मुंबई : 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व सात आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केल्याने एक ऐतिहासिक वळण घडले आहे. या निर्णयामुळे गेली १७ वर्षे न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या आरोपींच्या भावनांना ऊत आला. यातील एक प्रमुख आरोपी व माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची पहिली प्रतिक्रिया देखील समोर आली आहे.
“भगवा आतंकवाद म्हणून ज्यांनी आमच्यावर शिक्का मारला, त्यांना देवच योग्य ती शिक्षा देईल”
— साध्वी प्रज्ञा ठाकूर, माजी खासदार
त्या पुढे म्हणाल्या, “माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं, मी १७ वर्षे अपमान सहन केला. आम्हाला माहित होतं की आम्ही निर्दोष आहोत, पण तरीही आम्हाला दहशतवादी ठरवण्यात आलं. मी संन्यासी आहे म्हणूनच जिवंत आहे. हा विजय भगव्याचा आहे, हिंदुत्वाचा आहे.”
समीर कुलकर्णी कोर्टातच कोसळले अश्रूंनी…
सहआरोपी समीर कुलकर्णी यांना कोर्टातच अश्रू अनावर झाले. “माझ्या देशाने मला दहशतवादी ठरवलं, कुटुंबीयांची समाजात अवहेलना झाली. पण आम्ही खंबीरपणे लढा दिला,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. न्याय मिळाल्याने त्यांनी कोर्टाच्या आणि जनतेच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली.
“पुनर्जन्म मिळाल्यासारखं वाटतंय” — इतर आरोपींच्या भावना
कोर्टाने निर्दोष मुक्त केलेले अन्य आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी यांनीही १७ वर्षांच्या लढ्याची व्यथा मांडली.
मेजर उपाध्याय म्हणाले, “माझ्या स्वतःच्या देशात मला दहशतवादी ठरवलं गेलं, ही वेदना शब्दांत मांडता येणार नाही.”
राजकीय प्रतिक्रिया….
भाजप नेत्या उमा भारती यांनी ‘एक्स’ या सोशल प्लॅटफॉर्मवर प्रतिक्रिया देत लिहिले, “भोपाळच्या माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर आज निर्दोष सिद्ध झाल्या आहेत. न्यायालयाचे व प्रज्ञाजींचे अभिनंदन.”
Editer Sunil thorat





