‘रेशीम ग्राम’ संकल्पनेतून ग्रामीण भागाचे आर्थिक सक्षमीकरण ; प्रधान सचिव अन्शु सिन्हा…

पुणे (खेड) : ‘रेशीम ग्राम’ संकल्पनेच्या माध्यमातून रेशीम शेतीमुळे ग्रामीण भागातील शेतकरी, सुशिक्षित बेरोजगारांकरिता रोजगार निर्मिती आणि त्या माध्यमातून त्यांचे आर्थिक सक्षमीकरण होईल, जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकरी व उद्योजकांनी रेशीम शेती उद्योगात सहभागी व्हावे, असे आवाहन वस्त्रोद्योग विभागाच्या प्रधान सचिव अन्शु सिन्हा यांनी केले.
खेड तालुक्यातील वाकी येथील सिल्कबेरी चाँकी सेंटरला शुक्रवारी (दि. १) दिलेल्या भेटी प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा रेशीम कार्यालय पुण्याचे रेशीम विकास अधिकारी संजय फुले, मंत्रालयीन रेशीम कक्षचे रेशीम विकास अधिकारी विठ्ठल फड, प्रादेशिक रेशीम कार्यालयाचे वरिष्ठ तांत्रिक सहायक मधुकर आगम, सिल्कबेरी चाँकी सेंटरचे संचालक विजय गारगोटे, रेशीम उत्पादक विठ्ठल सुकाळे, शेतकरी यावेळी उपस्थित होते.
श्रीमती सिन्हा म्हणाल्या, शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून तुती लागवडीपासून रेशीम वस्त्र निर्मितीपर्यंत अखंड मूल्यवर्धित साखळी तयार केल्यास जिल्ह्यात रेशीम शेती उद्योग वाढीस गती मिळेल. एक एकर तुतीची लागवड केल्यास पाच लोकांना वर्षभर रोजगार मिळवून देण्याची क्षमता यामध्ये आहे. यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावून, अर्थचक्र वाढून ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होणार आहे.
रेशीम शेतीतून हमखास व शाश्वत उत्पन्न मिळत असून राज्यातील असंख्य शेतकरी रेशीम शेती उद्योगातून लखपती होत आहे. नव्याने रेशीम शेती उद्योग करू इच्छिणाऱ्या तसेच रेशीम धागा निर्मिती व त्याअनुषंगिक रेशीम पूरक व्यवसायाकरिता शेतकऱ्यांना व उद्योजकांना बँकांनी पतपुरवठा करण्यास पुढे येणे गरजेचे आहे, असेही श्रीमती सिन्हा म्हणाल्या.
रेशीम ग्राम संकल्पना…
राज्यात ‘रेशीम ग्राम’ संकल्पना मोठ्या प्रमाणात नावारूपास येण्याकरिता प्रयत्न करणे गरजेचे आहे. गावामध्ये नव्याने रेशीम शेती करू इच्छिणारे शेतकरी तसेच उद्योजकांना चालना मिळण्यासाठी गावातच तुतीच्या रोप, कोश आणि धागा, रेशीम वस्त्राची निर्मिती, धाग्याला रंग देण्यासह मुलायम करण्याचा अंतर्भाव, रेशीम प्रशिक्षण केंद्र, रेशीम शेती उद्योगासाठी आवश्यक असणारे औषधी व साहित्य विक्री केंद्र, रेशीम पूरक व्यवसाय या रेशीमग्राम संकल्पनेत असणार आहे.
यावेळी श्रीमती सिन्हा यांनी सिल्कबेरी चाँकी सेंटरच्या माध्यमातून पुणे, अहिल्यानगर, सोलापूर आदी जिल्ह्यापर्यंत शेतकऱ्यांना चाँकी पुरवठ्यासोबतच रेशीम शेतकऱ्यांना आवश्यक असणारी औषधी, साहित्य, तांत्रिक सल्ला व प्रशिक्षणाबाबत माहिती घेतली.
Editer sunil thorat




