
पुणे (हडपसर) : रयत शिक्षण संस्था गर्ल्स इंग्लिश मिडीयम स्कूल, हडपसर येथे सायबर सुरक्षेविषयी जागरूकता वाढवण्यासाठी एक उल्लेखनीय व प्रेरणादायी उपक्रम पार पडला. अण्णासाहेब मगर महाविद्यालयातील सायबर वॉरियर्स टीमने Quick Heal Foundation अंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेची सखोल माहिती दिली.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी सजग आणि सक्षम बनवणे हा होता. विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद देत या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त स्वागताने झाली. सायबर वॉरियर्स तेजस दळवी आणि आश्लेषा दामगुडे यांनी सोशल मीडियावरील फसवणूक, पासवर्ड सुरक्षितता, OTP स्कॅम, फिशिंग, ओळख चोरी अशा महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर प्रभावी व संवादात्मक पद्धतीने मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी या सत्रात प्रश्न विचारून आणि आपले अनुभव शेअर करून सायबर सुरक्षेच्या महत्त्वाकडे आपले लक्ष वेधले. कार्यक्रमाच्या अखेरीस सर्व विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षेची शपथ घेतली आणि डिजिटल जगात जबाबदारीने वागण्याचा संकल्प केला.
या कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, तसेच डॉ. शुभांगी औटी, डॉ. विलास वाणी, प्रा. अनिल जगताप व प्रा. मनिषा गाडेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
शाळेच्या मुख्याध्यापिका Mrs. Zeenat Sayed व सर्व शिक्षकांनी या उपक्रमाचे कौतुक करत सांगितले की, “अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये केवळ तांत्रिक नव्हे तर सामाजिक भानदेखील विकसित होते. या प्रकारच्या कार्यक्रमांची पुनरावृत्ती व्हावी अशी आमची इच्छा आहे.”
हा उपक्रम विद्यार्थ्यांना डिजिटल युगातील जबाबदारीची जाणीव देणारा ठरला असून, शाळा स्तरावर सायबर शिक्षणाची पायाभरणी करणारा महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे.
Editer sunil thorat







