
सोलापूर (माढा) : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त रांजणी (ता. माढा, जि. सोलापूर) येथे लहुजी ग्रुप रांजणीच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत एकूण ५१ रक्तदात्यांनी सहभाग घेतला. या माध्यमातून सामाजिक बांधिलकीची जाणीव अधिक बळकट होताना दिसली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमोद भाऊ खंडागळे होते. प्रमुख उपस्थित मान्यवरांमध्ये ग्रामपंचायत सदस्य प्रवीण बल्ली गायकवाड, भैय्यासाहेब चव्हाण, संतोष गायकवाड, भैय्यासाहेब मस्के, दिपक भिसे, सहदेव भिसे, महादेव भिसे, विकास चव्हाण, निलेश शिरसागर, चंद्रकांत माने, संतोष मदने, नागेश भिसे यांचा समावेश होता.
प्रमुख वक्त्यांनी आपल्या भाषणात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक योगदानाची आठवण करून दिली. त्यांनी आयुष्यभर वंचित, उपेक्षित समाज घटकांसाठी लढा दिला. त्यांच्या प्रेरणेतून नवयुवकांनी समाजोपयोगी उपक्रमांत सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
या उपक्रमाचे यशस्वी आयोजन लहुजी ग्रुप रांजणीच्या वतीने करण्यात आले. यामुळे अण्णाभाऊ साठे यांचा सामाजिक संदेश अधिक प्रभावीपणे समाजात पोहोचला, असे मत नागरिकांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व रक्तदात्यांचे विशेष सत्कार करून आभार मानण्यात आले.
प्रतिनिधी धनंजय काळे




