
पुणे (हवेली) : “भारताला गरिबीमधून बाहेर काढायचे असेल, तर डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांचे विचार आणि शिफारसी भारत सरकारने अंगीकारल्या पाहिजेत. भारत कृषिप्रधान देश असून रासायनिक शेतीपेक्षा सेंद्रिय पद्धतीने शेती केल्यास अन्नधान्य उत्पादनात वाढ होईल आणि भारतातील एकही व्यक्ती भुकेने मरणार नाही,” असे प्रतिपादन प्रा. सतीश कुदळे यांनी केले.
समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालय, लोणी काळभोर येथील अर्थशास्त्र विभागाच्या वतीने डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या जयंतीनिमित्त ‘शाश्वत शेती दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमात बोलताना प्रा. कुदळे यांनी अन्न सुरक्षा, सेंद्रिय शेती आणि ग्रामीण भारताच्या समृद्धीसाठी आवश्यक उपायांवर भाष्य केले. त्यांनी डॉ. रंगनाथस्वामी यांच्या विचारांची आठवण करून दिली आणि त्यांचे स्वप्न साकार करण्याचे आवाहन उपस्थितांना केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. अंबादास मंजुळकर यांनी भूषवले. ते म्हणाले, “शेतीचा शोध स्त्रियांनी लावला. भविष्यात शेती स्त्रियांच्या हाती गेल्यास भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईल. सध्या शेतकऱ्यांची स्थिती दयनीय असून डॉ. स्वामीनाथन यांच्या विचारांचा अवलंब केल्यास शेतकरी आत्महत्या रोखता येतील.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विजयकुमार घोडके यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. गणेश गाडेकर यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. शेखर पाटील यांनी केले.
महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाश्वत शेतीच्या दिशेने टाकलेले हे पाऊल ग्रामीण विकासासाठी आशादायक ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
Editer sunil thorat




