
पुणे (हवेली) : (दि.०६ ऑगस्ट २०२५) “एकविसाव्या शतकात शिक्षणाची परिभाषा बदलली असून, आता शिक्षण हे केवळ पदवीपुरते न राहता, राष्ट्राच्या प्रगतीचे महत्त्वाचे साधन ठरत आहे. विज्ञान, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीसह इतर क्षेत्रांतील समस्यांवर उपाय शोधण्यासाठी नाविन्यपूर्ण आणि धाडसी विचारसरणी आवश्यक आहे,” असे प्रतिपादन विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा. डॉ. अभय करंदीकर यांनी केले.
ते एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे येथे पार पडलेल्या विद्यारंभ-२५ या १०व्या स्वागत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी एमआयटी समुहाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., प्र-कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. मोहित दुबे व इतर मान्यवर उपस्थित होते.
डॉ. करंदीकर म्हणाले, “डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी सांगितल्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत. त्यातून येणारे अपयश देखील ऐतिहासिक असते. एमआयटी एडीटी विद्यापीठातील ‘क्रेया’, ‘रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर’ यांसारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमधून ७५ हून अधिक संशोधन प्रकल्प चालू आहेत, हे पाहून अत्यंत समाधान वाटले.”
कार्यक्रमात अध्यक्षीय भाषण करताना प्रा. डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, “मी गुरे चारताना शहरात जाऊन अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले होते. म्हणूनच, विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत. आज संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे आहे. कारण, भारतीय संस्कृतीत संपूर्ण जगाला सुख, शांती व समाधानाचा मार्ग दाखविण्याचे सामर्थ्य आहे.”
कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “आज AI आणि डिजिटल तंत्रज्ञानामुळे शिक्षणात मोठा बदल होत आहे. त्यामुळे केवळ पारंपरिक शिक्षण न पुरेसे राहता, कौशल्यविकास आणि नवउद्योजकतेकडे विद्यार्थ्यांचा कल असायला हवा. एमआयटी एडीटी विद्यापीठ ही जबाबदारी सक्षमपणे पेलत असून यंदा ५,००० हून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन आपला विश्वास दाखविला आहे.”
कार्यक्रमाची सुरुवात विश्वशांती प्रार्थनेने झाली व सांगता राष्ट्रगीताने झाली. प्रास्ताविक प्रा. डॉ. राजेश एस. यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. श्रद्धा वाघटकर व डॉ. अशोक घुगे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. मोहित दुबे यांनी मानले.
प्रतिनिधी तुळशीराम घुसाळकर



