शौचालयाच्या खिडकीतून आरोपीची थरारक पलायनकथा ; लोणी काळभोर पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुन्हा जेरबंद…
अपहरणप्रकरणातील आरोपी हॉटेलच्या टॉयलेटमधून पळाला • शिताफीने पुन्हा अटक ; पोलिसांची तातडीची कारवाई...

तुळशीराम घुसाळकर
पुणे (हवेली) : अपहरणाच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपीने पोलिसांना शौचाचा बहाणा देत हॉटेलमधील शौचालयाची काच फोडून धक्कादायकरीत्या पलायन केले. मात्र लोणी काळभोर पोलिसांच्या तत्पर आणि शिताफीच्या कारवाईमुळे त्याला काही तासांत पुन्हा जेरबंद करण्यात यश आले. ही घटना लोणी काळभोर येथील माळीमळा परिसरात रात्रीच्या सुमारास घडली.
घटनाक्रम असा घडला…
माळशिरस (जि. सोलापूर) येथे अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी गणेश बाळु ऊर्फ बाळासाहेब जाधव (वय २०, रा. जाधववाडी, ता. माळशिरस) या तरुणास अटक करण्यात आली होती. २ ऑगस्ट रोजी अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला ५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. चौकशीतून समोर आले की, तो आणि अल्पवयीन मुलगी १० जुलै ते १ ऑगस्टदरम्यान आळंदी (पुणे) येथे मुक्कामाला होते.
या पार्श्वभूमीवर माळशिरस पोलीस पथकाने ४ ऑगस्ट रोजी घटनास्थळाचा पंचनामा करण्यासाठी आळंदीकडे रवाना झाले होते. रात्री उशिरा परतताना लोणी काळभोर येथील माळीमळा परिसरात आरोपीने शौचास जाण्याचा बहाणा केला. त्यामुळे पोलिसांनी हॉटेल ‘शौर्यवाडा’ समोर गाडी थांबवली आणि त्याला टॉयलेटमध्ये नेले. यावेळी जाधवने टॉयलेटच्या खिडकीची काच फोडून बाहेर उडी मारून पोबारा केला.
पोबारा लक्षात येताच तत्काळ गुन्हा दाखल…
पोलीस हवालदार सचिन भोसले यांनी घटनेची माहिती देताच लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात नवीन गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाच्या गांभीर्याची जाणीव ठेवून वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शोधपथक तयार करण्यात आले.
पोलिसांची शिताफी, आरोपी पुन्हा अटकेत!
लोणी काळभोर आणि माळशिरस पोलीस पथकांनी संयुक्त तपास करत बाळु जाधवचा शोध घेतला आणि काही तासांतच त्याला पुन्हा अटक करण्यात यश मिळवले.
ही यशस्वी कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पो.नि. दिगंबर सोनटक्के, पो.अं. संदीप धुमाळ, अंकुश बोराटे व इतर पथकांनी पार पाडली.
Editer sunil thorat




