रोहित्र फोडून दीड लाखांचे तांब्याच्या तारा लंपास! कुंजीरवाडी व तरडे परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ…
महावितरणचे दोन रोहित्र फोडले • ६५० किलो तांब्याची तारे चोरी • पोलिसांकडून तपास सुरू...

तुळशीराम घुसाळकर
पुणे (ता. हवेली) : हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी पाणीपुरवठा योजना व तरडे गावातील महावितरणच्या रोहित्रांवर अज्ञात चोरट्यांनी धाडसी हल्ला करत तब्बल १ लाख ५९ हजार रुपये किंमतीच्या ६५० किलो तांब्याच्या तारा चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ निलेश भोंडवे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
घटनाक्रमाचा तपशील…
फिर्यादी निलेश बाळकृष्ण भोंडवे (वय ३३, रा. म्हातोबाची आळंदी, ता. हवेली) हे उरुळी कांचन महावितरण उपविभागीय कार्यालयात वरिष्ठ तंत्रज्ञ पदावर कार्यरत आहेत. रविवारी त्यांना तरडे गावातील रोहित्र जमिनीवर पडले असल्याची माहिती एका स्थानिक शेतकऱ्याने दिली.
घटनेची माहिती मिळताच ते त्वरित घटनास्थळी पोहोचले. पाहणी केली असता, चोरट्यांनी रोहित्राचे झाकण उचकटून आतून तांब्याच्या वायर काढल्या असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याचप्रमाणे कुंजीरवाडी येथील पाणीपुरवठा योजनेचे रोहित्र देखील फोडण्यात आले असून, दोन्ही ठिकाणांहून मिळून सुमारे दीड लाख रुपयांहून अधिक किंमतीचा तांब्याचा मुद्देमाल चोरीस गेला आहे.
तपास सुरु…
या प्रकारामुळे महावितरणच्या यंत्रणेसमोर सुरक्षा आणि देखभाल याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, वीजपुरवठा बाधित होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
या चोरीप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विलास शिंदे पुढील तपास करत आहेत.
Editer sunil thorat




