मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पुणे विभागातील ६३९५ गरजू रुग्णांना ५५ कोटींची मदत ; पेपरलेस प्रणालीमुळे रुग्णांना मोठा दिलासा… वाचा सविस्तर…

मुंबई : (दि. ६ ऑगस्ट २०२५) राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष हा मोठा आधार बनला असून, पुणे विभागात जानेवारी ते जुलै २०२५ या सात महिन्यांत तब्बल ६३९५ रुग्णांना ५४ कोटी ९१ लाख ३७ हजार रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर पेपरलेस व डिजिटल प्रणाली सुरू करण्यात आली आहे. यामुळे रुग्णांना थेट मंत्रालयात येण्याची गरज भासत नाही. जिल्हा स्तरावरच मदतीसाठी अर्ज करता येत असल्याने कार्यपद्धती अधिक पारदर्शक आणि गतिमान झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली.
२० गंभीर आजारांसाठी मदत उपलब्ध…
या निधीमधून खालील २० गंभीर आजारांवर उपचारांसाठी आर्थिक मदत दिली जाते…
हृदय, यकृत, किडनी, फुफ्फुस प्रत्यारोपण
बोन मॅरो व हाताचे प्रत्यारोपण
कर्करोग शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिएशन
रस्ते अपघात व विद्युत अपघात
हिप/गुडघा रिप्लेसमेंट
लहान बालकांची शस्त्रक्रिया
नवजात शिशू आजार, मेंदूचे विकार
डायालिसिस, अस्थिबंधन, भाजलेले रुग्ण
कॉक्लियर इम्प्लांट (वय २-६ वर्षे)
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
1. रुग्णाचे आधार व रेशन कार्ड
2. उत्पन्नाचा दाखला (१.६० लाखांपेक्षा कमी उत्पन्न)
3. वैद्यकीय रिपोर्ट व खर्चाचे प्रमाणपत्र
4. जिओ टॅग फोटो (रुग्ण दाखल असल्यास)
5. अपघातप्रकरणी एफआयआर / झेडटीसीसी नोंदणी (प्रत्यारोपणासाठी)
6. रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी प्रणालीवर असणे आवश्यक
सर्व कागदपत्रे PDF स्वरूपात खालील ईमेलवर पाठवावीत : aao.cmrf-mh@gov.in
📞 टोल फ्री क्रमांक: ९३२१ १०३ १०३
पुणे विभागातील जिल्हानिहाय मदतीचा आढावा (१ जानेवारी – ३१ जुलै २०२५)
जिल्हा, रुग्णसंख्या, मदत रक्कम पुढीलप्रमाणे
पुणे २१४२ ₹२० कोटी ५६ लाख ९१ हजार
कोल्हापूर १७१३ ₹१३ कोटी १७ लाख ६४ हजार
सांगली ९३६ ₹७ कोटी ३५ लाख ७८ हजार
सोलापूर ७६४ ₹६ कोटी ५८ लाख २० हजार
सातारा ८४० ₹७ कोटी २२ लाख ८५ हजार
राज्यभर पेपरलेस प्रणाली, जिल्हा कक्ष स्थापन, आणि पारदर्शक व्यवस्थेमुळे रुग्णांना वेळेत आणि थेट मदत मिळत आहे. येत्या काळातही अधिकाधिक गरजू रुग्णांपर्यंत ही सेवा पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे, असेही रामेश्वर नाईक यांनी स्पष्ट केले.
Editer sunil thorat





