कदमवाकवस्तीतील राजधानी बेकरीच्या केकमध्ये आळ्या ; लोणी काळभोर पोलिसांची कारवाईत, बेकरी सील… व्हिडिओ पहा…
सोलापूर महामार्गालगत कदमवाकवस्ती (कवडीपाठ) येथे धक्कादायक प्रकार...

पुणे (हवेली) : पुणे सोलापूर महामार्गालगत कदमवाकवस्ती (कवडीपाठ) येथील राजधानी बेकरीमध्ये विक्रीस असलेल्या केकमध्ये आळ्या आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, मुलांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या बेफिकीर व्यावसायिकांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
घटना कशी उघडकीस आली?
स्थानिक महिलेनं आपल्या लहान मुलांसाठी राजधानी बेकरीतून केक खरेदी केला. घरी गेल्यानंतर केक कापल्यावर त्यामध्ये आळ्या असल्याचं दिसून आलं. हा धक्कादायक प्रकार लक्षात येताच पालक व नागरिकांनी बेकरीवर धाव घेत तीव्र निषेध व्यक्त केला.
पोलिसांची तातडीची कारवाई
लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने पोलीस उपनिरीक्षक योगेश पैठणे यांच्या नेतृत्वाखाली पथक पाठवलं. बेकरीमधील केक व इतर खाद्यपदार्थ ताब्यात घेऊन वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या गायकवाड मॅडम यांच्याशी संपर्क साधून नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याची माहिती सांगण्यात आली.
प्राथमिक कारवाईत लोणी काळभोर पोलीस स्टेशन कडून बेकरी तात्काळ सील करण्यात आली.
कायदा काय सांगतो?
अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ (Food Safety and Standards Act, 2006) नुसार —
अन्नपदार्थामध्ये आळ्या, कीड, अशुद्धता किंवा हानिकारक घटक आढळल्यास हा गंभीर गुन्हा मानला जातो. दोष सिद्ध झाल्यास कारावास आणि आर्थिक दंडाची तरतूद आहे.
नागरिकांची तीव्र प्रतिक्रिया…
परिसरात या घटनेची मोठी चर्चा रंगली असून पालक संघटनांनी अन्नसुरक्षा विभागाने अशा बेकऱ्यांची नियमित तपासणी करण्याची मागणी केली आहे. काही स्थानिकांनी आरोप केला की, “अन्न फुड अधिकारी यांच्याशी संपर्क साधल्यावर तक्रार नोंदवल्याशिवाय कारवाई होणार नसल्याचं बेजबाबदार उत्तर मिळालं. मुलांच्या आरोग्याशी खेळ करणे असह्य आहे.”
पुढील पाऊल…
अन्न व औषध प्रशासन (FDA) केकचे नमुने तपासून अहवाल तयार करेल. अहवाल आल्यानंतर FSSAI Act 2006 अंतर्गत गुन्हा दाखल करून बेकरी मालकावर कठोर दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे.
Editer sunil thorat




