महाराष्ट्रशिक्षणसामाजिक

एमआयटी एडीटी विद्यापीठाचा १०वा स्थापना दिन उत्साहात साजरा ; एमआयटी एडीटी-२.० ला प्रारंभ, विद्यार्थ्यांनो मराठी शिकण्याचा प्रयत्न करा – डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे (हवेली) : मराठी भाषा ही अत्यंत प्राचीन आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असून तिला हजारो वर्षांचा वारसा लाभला आहे. मराठी साहित्य, नाटकं, गाणी यांचा खजिना अप्रतिम आहे. त्यामुळे महाराष्ट्रात शिक्षणासाठी परराज्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे आवाहन महाराष्ट्र विधानसभेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. “महाराष्ट्रीयन जेवण सर्वांनाच आवडते, आणि मराठीत बोलल्यास मराठी माणूस दोन घास जास्त प्रेमाने वाढतो,” अशी कोटी त्यांनी अस्खलित इंग्रजी भाषेत करून उपस्थित विद्यार्थ्यांकडून टाळ्यांचा कडकडाट मिळवला.

एमआयटी आर्ट, डिझाईन व टेक्नॉलॉजी (एमआयटी एडीटी) विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणेच्या १०व्या स्थापना दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष व प्र-कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड होते. या कार्यक्रमाला भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) वैज्ञानिक पद्मश्री डॉ. नागराजन वेदाचलम, मालवीय राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचे संचालक प्रा. डॉ. एन.पी. पाधी, कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., इस्कॉन पुणे प्रमुख राधेशाम, कार्यकारी संचालक प्रा. डॉ. सुनीता कराड, प्र-कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. मोहित दुबे, कुलसचिव डॉ. महेश चोपडे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रा. डॉ. पाधी यांनी एमआयटी एडीटी विद्यापीठाला दशकपूर्तीबद्दल शुभेच्छा देत सांगितले की, आज अंतराळात पाठवलेल्या अनेक मायक्रो सॅटलाईट्स हे आयआयटीव्यतिरिक्त इतर संस्थांमधील विद्यार्थ्यांनी बनवले आहेत. भारतातील विद्यार्थ्यांत प्रचंड प्रतिभा असून, त्यांनी आत्मविश्वास ठेवून समर्पणाने काम केले तर कोणत्याही क्षेत्रात यश मिळवू शकतात.

कार्यक्रमात बिलिंग विभाग प्रमुख प्रा. प्रदीप प्रभू यांना विद्यापीठाच्या जडणघडणीतल्या बहुमूल्य योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. तसेच डॉ. अतुल पाटील, डॉ. राजशेखर राठोड, प्रा. तुषार चौरुशी, डॉ. शालिनी गर्ग, संदीप जाधव आणि यशस्विनी पिसोलकर यांनाही पुरस्कारांनी गौरविण्यात आले.

प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी सांगितले की, प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयटी एडीटी विद्यापीठाने एक दशक पूर्ण केले आहे. नॅककडून ‘अ’ श्रेणी मिळाल्यानंतर आता विद्यापीठाने “एमआयटी एडीटी व्हिजन-२.०” ची सुरुवात केली असून आंतरराष्ट्रीय मान्यता मिळविणे, कृत्रिम बुद्धिमत्तेत (AI) नवोपक्रम, मुक्त व दूरस्थ शिक्षण (ODL), तसेच देश-विदेशात कॅम्पस उभारणी यासारखे प्रयत्न केले जाणार आहेत.

यावेळी पद्मश्री डॉ. नागराजन वेदाचलम म्हणाले, “मी कुठल्याही आयआयटीमध्ये शिकलो नाही, पण गणित, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्राची प्रचंड आवड होती. प्रतिभावान वैज्ञानिक केवळ आयआयटीतच घडतात असे नाही. पायाभूत ज्ञान मजबूत असेल आणि समस्यांचे निराकरण करण्याची सर्जनशीलता असेल, तर एमआयटीसारख्या संस्थांमधूनही उत्कृष्ट संशोधक तयार होऊ शकतात.”

विश्वशांती प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि राष्ट्रगीताने समारोप झाला. प्रास्ताविक कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस. यांनी केले, तर आभार प्र-कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. श्रद्धा वाघटकर, प्रा. स्वप्निल शिरसाठ आणि डॉ. अशोक घुगे यांनी केले.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??