कदमवाकवस्ती परिसरात पॅगो / ऑटो रिक्षांमधून अवैध प्रवासी वाहतूक ; प्रवाशांच्या जीवाशी सुरू आहे खेळ, वाहतूक प्रशासनाचे दुर्लक्ष…

पुणे (हवेली) : कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत पॅगो ऑटो रिक्षांच्या माध्यमातून अवैध प्रवासी वाहतूक सर्रास सुरू असून, हडपसर रवी दर्शन, १५ नंबर, शेवाळे वाडी, कवडी पाठ, लोणी स्टेशन ते थेऊर फाटा, कुंजीर वाडी, ते उरूळी कांचन या मार्गावर दररोज ८ ते १० प्रवाशांना परवान्यावरील मर्यादा मोडून धोकादायक प्रवास घडवला जात आहे. या प्रकारामुळे प्रवाशांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाला असून, वाहतूक विभाग व पोलिसांचे याकडे उघडपणे दुर्लक्ष असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. एखाद्या प्रवाशांचा यात अपघात झाला तर जबाबदार कोण?
मिळालेल्या माहितीनुसार, तीन प्रवासी वाहतुकीचा परवाना असतानाही अनेक पॅगो ऑटो रिक्षा क्षमता ओलांडून प्रवासी घेऊन जात आहेत. यामुळे अपघाताचा धोका वाढत असून, नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांनी सांगितले की, “या बाबत आमच्याकडून कार्यवाही सुरू असून, दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल.” असे बोलताना सांगितले.
दरम्यान, स्थानिक नागरिकांनी केवळ अवैध प्रवासी वाहतूकच नव्हे, तर यामध्ये गाडीला नंबर नसलेल्या रिक्षा, प्रायव्हेट चार चाकी, ट्रॅव्हल्स या परिसरातील बेकायदेशीर व्यवसाय आणि नियमभंग करणाऱ्या गाड्यांवर तात्काळ बंद कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
Adv. बाळासाहेब दाभाडे यांनी प्रशासनावर जोरदार टीका करताना सांगितले, “कदमवाकवस्ती ते लोणी स्टेशन परिसरातून सुरू असलेली अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी वाहतूक शाखेने त्वरित पावले उचलली पाहिजेत. प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या संबंधित वाहतूक अधिकारी यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे.” अन्यथा अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहतुकी विरोधात संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.
या संपूर्ण प्रकरणामुळे कदमवाकवस्ती ग्रामपंचायत ते लोणी स्टेशन परिसरातील वाहतुकीच्या सुरक्षितते बाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिक आता प्रशासनाच्या पुढील पावलाकडे लक्ष ठेवून आहेत.
Editer sunil thorat





