
तुळशीराम घुसाळकर पुणे
पुणे (हवेली) : (ता. १२) गणेशोत्सव काळात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे होणारे पाणी प्रदूषण रोखण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शाडूच्या मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत ५० गणेशमूर्ती तयार केल्या.
कार्यक्रमाचे उद्घाटन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अर्थसचिव व विद्यालयाचे प्राचार्य सीताराम गवळी यांच्या हस्ते झाले. त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना, “शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती बनविणे ही केवळ कला नाही तर पर्यावरणपूरक जीवनशैलीकडे टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे” असे सांगितले.
पर्यावरणपूरकतेचा संदेश…
रोटरी क्लब हवेली ईस्टचे अध्यक्ष ज्ञानदेव शेवाळे यांनी इंटरॅक्ट क्लबमुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, सामाजिक जाणीव आणि बांधिलकी निर्माण होते, असे प्रतिपादन केले. सचिव अशोक पांढरे यांनी प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे होणारे पाणी प्रदूषण थांबवण्यासाठी शाडूच्या मातीच्या मूर्तींचा वापर करण्याचे आवाहन केले.
प्रत्यक्ष प्रात्यक्षिक व निर्मिती…
अश्विनी कुदळे यांनी शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती बनविण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखविले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने गणेशमूर्ती तयार केल्या. या सर्व मूर्ती घराघरात प्राणप्रतिष्ठा करून पर्यावरण संवर्धनासाठी वापरण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला.
इंटरॅक्ट क्लब पदग्रहण…
कार्यक्रमादरम्यान इंटरॅक्ट क्लबचा पदग्रहण समारंभही पार पडला. यावर्षी अध्यक्ष म्हणून संग्राम काळभोर, सेक्रेटरी ओम वसावे, प्रेसिडेंट इलेक्ट श्रेयस गवळी, व्हाईस प्रेसिडेंट प्रेम क्षीरसागर आणि ट्रेझरर श्रेयस हांडे यांची निवड करण्यात आली.
विशेष प्रदर्शन…
ज्येष्ठ शिक्षक रोहन साठे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी अटल लायब्ररीतील साहित्य वापरून तयार केलेला व्हॅक्युम क्लिनरचे प्रात्यक्षिक सादर केले. या कार्यक्रमाचे आयोजन जेष्ठ शिक्षिका शर्मिला साळुंखे आणि उपमुख्याध्यापक विलास शिंदे यांनी केले, तर सूत्रसंचालन दयानंद जानराव यांनी केले.
Editer Sunil thorat





