
पुणे (हवेली) : कवडीपाठ येथे साहित्यरत्न, लोकशाहीर, संघर्षाचे प्रतीक अण्णा भाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त कवडीपाठ (कदमवाकवस्ती) येथे वार्ड क्रमांक १ मध्ये सामाजिक एकोपा, सांस्कृतिक ऐक्य आणि जनजागृतीचे दर्शन घडवणारी भव्य मिरवणूक काढण्यात आली. घोषणांचा जयघोष आणि सांऊडच्या गाण्याच्या तालावर नाचत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीचे दृश्य पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने दुतर्फा उपस्थिती लावली होती.
प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात….
कार्यक्रमाचा शुभारंभ अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाला. या पूजन प्रसंगी गुन्हे पोलीस निरीक्षक स्मिता जाधव, पोलीस उपनिरीक्षक उदय काळभोर, नवपरीवर्तन फाऊंडेशनचे अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड आणि ग्रामपंचायत सदस्या अस्मिता लोंढे यांनी उपस्थित राहून हाय व पुष्प अर्पण केले. पूजनावेळी अण्णा भाऊंच्या संघर्षमय जीवनाचा आणि साहित्यसंपदेचा गौरव करण्यात आला.
साऊंड सिस्टीम आणि घोषणांच्या उत्साहात मिरवणुकीचे आयोजन…
सामाजिक कार्यकर्ते राकेश आंगतरावर लोंढे यांच्या नेतृत्वाखाली भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. साऊंड सिस्टीमच्या तालावर “जय अण्णा भाऊ साठे” अशा घोषणांचा जयघोष होत होता. मार्गक्रमणादरम्यान तरुणांच्या हातात अण्णा भाऊंचे फोटो, झेंडे दिसत होते. या वातावरणात देशभक्ती आणिसमाजभानाची ऊर्जा दरवळत होती.
गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग…
या मिरवणुकीत ग्रामपंचायत उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध संघटनांचे पदाधिकारी, महिला मंडळ, युवक संघटना आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. दुकानांसमोरून मिरवणुकीचे दुतर्फा नागरिकांनी स्वागत केले.
कार्यक्रमाची सांगता आणि संदेश…
मिरवणुकीनंतर सर्वांनी अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचा गौरव करत त्यांच्या साहित्य, सामाजिक कार्य आणि श्रमिक वर्गासाठी केलेल्या लढ्याची आठवण करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहिर यांच्या दमदार आवाजात झाले, तर शेवटी “एकता, समता आणि बंधुता” यांचा संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Editer sunil thorat





