वालचंदनगर पोलीस स्टेशनला आय.एस.ओ 9001-2015 मानांकन; स्मार्ट पोलीस ठाण्याच्या श्रेणी A++ मध्ये स्थान…

संपादक डॉ गजानन टिंगरे
पुणे (इंदापूर) : (ता. 14 ऑगस्ट) इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर पोलीस स्टेशनने उत्कृष्ट कार्यपद्धती, अत्याधुनिक सुविधा, तंत्रज्ञानाचा वापर आणि नागरिकाभिमुख सेवा यामुळे आय.एस.ओ 9001-2015 सर्टिफाईड स्मार्ट पोलीस स्टेशन श्रेणी A++ मानांकन मिळवून एक नवा मानाचा टप्पा गाठला आहे. सोलापूर येथील मानांकन संस्थेच्या पाहणीत हे ठाणे 100 पैकी 93 गुण मिळवत पुणे ग्रामीण जिल्ह्यातील नवीन निकषांनुसार स्मार्ट पोलीस स्टेशनचा दर्जा मिळवणारे दुसरे पोलीस ठाणे ठरले आहे.
37 निकषांतून उत्तीर्ण…
स्मार्ट पोलीस स्टेशन मानांकनासाठी 37 महत्त्वाचे निकष ठरवण्यात आले आहेत. यात तक्रार निवारण प्रक्रिया, गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानाचा वापर, दस्तऐवज नियंत्रण, रात्रगस्त, अवैध धंद्यांवर कारवाई, सायबर क्राईम प्रतिबंध, जनतेचे अभिप्राय, संगणकीकरण यांचा समावेश आहे. या सर्व अटींचे तंतोतंत पालन केल्यामुळे हे यश मिळाले.
दर शनिवारी तक्रार निवारणासाठी विशेष बैठक आयोजित केली जाते, तसेच दाखल झालेल्या गुन्ह्यांपैकी तब्बल 85 टक्के गुन्ह्यांचा निपटारा करण्यात आला आहे.
आधुनिक सुविधा आणि हरित परिसर…
सन 1990 मध्ये स्थापन झालेले हे पोलीस स्टेशन 2024 मध्ये ९ कोटी रुपयांचा खर्च करून नव्या, सुसज्ज इमारतीत स्थलांतरित झाले. ५ एकराच्या विस्तीर्ण परिसरात पोलीस अधिकाऱ्यांसाठी ४ निवासस्थाने, ३०० फळझाडे व देशी वृक्षांची लागवड, नागरिक व पोलीसांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
नवीन इमारतीत पोलीस अधिकारी, फौजदार, गोपनीय, क्राईम, ठाणे अंमलदार, वायरलेस अशा विविध विभागांसाठी स्वतंत्र खोल्या आहेत. महिला व पुरुष कैद्यांसाठी स्वतंत्र कोठड्या, सुसज्ज स्वच्छतागृहे, फर्निचर, सौर ऊर्जा प्रणाली, फायर सिस्टीम, पिण्याच्या पाण्याची सोय यांसारख्या सुविधा आहेत. तक्रार देण्यासाठी आलेल्या नागरिकांना स्वतंत्र बसण्याची सोय, तसेच वाचनासाठी वर्तमानपत्रे, मासिके उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे ठाणे…
वालचंदनगर पोलीस स्टेशन हे बारामती-इंदापूर पालखी महामार्गावरील महत्त्वाच्या जंक्शनवर असून, संवेदनशील ठिकाण म्हणून ओळखले जाते. स्थानिक तसेच प्रवासी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हे ठाणे महत्वाची भूमिका बजावत आहे.
नेतृत्व आणि संघाची मेहनत…
मा. संदीपसिंह गिल्ल (पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण), मा. गणेश बिरादार (अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग), मा. डॉ. सुर्दशन राठोड (उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी राजकुमार डुणगे (सहा. पोलीस निरीक्षक) व त्यांच्या सहकाऱ्यांनी सातत्यपूर्ण मेहनत, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून हे यश मिळवले आहे.
Editer Sunil thorat





