आता होणार बोगस शिक्षकांचा पर्दाफाश ; ८ हजार शिक्षक, शिक्षकेतरांच्या कागदपत्रांची तपासणी सुरू…

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात शालेय शिक्षण विभागाने अखेर बोगस शिक्षक आणि बनावट आयडीधारक कर्मचाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई सुरू केली आहे. २०१२ पासून २०२५ पर्यंत शिक्षणाधिकाऱ्यांची बनावट मान्यता घेऊन शालार्थ प्रणालीत प्रवेश मिळवलेल्या आणि शासनाकडून पगार घेणाऱ्या ‘लाडक्या’ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पर्दाफाश करण्यासाठी सर्व कागदपत्रांची सखोल पडताळणी केली जात आहे.
८ हजार कर्मचाऱ्यांच्या नोंदींची चौकशी…
जिल्ह्यातील अनुदानित, अंशतः अनुदानित आणि विना अनुदानित शाळांमध्ये एकूण सुमारे ८ हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी अनेकांनी शिक्षणाधिकारी किंवा उपसंचालक यांच्या बोगस मान्यतेच्या आधारे बनावट शाळा आयडी तयार करून शालार्थ प्रणालीत नोंद करून घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यामुळे ते शासनाच्या पगार यादीत आले असून, वर्षानुवर्षे पगार घेत असतानाही संबंधित अधिकाऱ्यांनी डोळेझाक केल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
शिक्षण विभागाचा आदेश…
शालेय शिक्षण विभागाने ७ नोव्हेंबर २०१२ ते ७ जुलै २०२५ दरम्यान नियुक्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या फाइल्स तपासण्याचा निर्णय घेतला आहे. शालार्थ २.० मधील एम्प्लॉय कॉर्नरवर नियुक्ती आदेश, जॉईनिंग रिपोर्ट, संबंधित शिक्षणाधिकारी/उपसंचालक यांचे आदेश अपलोड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
१८ नोव्हेंबर २०१६ नंतरच्या नियुक्त्या – शिक्षण संचालक, उपसंचालक किंवा एसएससी बोर्ड अध्यक्षांकडून मिळालेल्या शालार्थ नोंद मंजुरी पत्राची मागणी
७ नोव्हेंबर २०१२ पूर्वी नियुक्त कर्मचारी – याबाबत स्वतंत्र आदेश काढला जाणार
भ्रष्टाचार उघड होण्याची भीती…
या तपासामुळे बोगस शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड हालचाल सुरू झाली आहे. वर्षानुवर्षे शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीवर डल्ला मारणाऱ्या टोळीचा भंडाफोड झाल्यास मोठ्या प्रमाणावर निलंबन, सेवा समाप्ती आणि गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.
कडक कारवाईची मागणी…
शिक्षण क्षेत्रातील तज्ञ आणि सामाजिक संघटनांनी शासनाकडे या भ्रष्टाचाराला पूर्णविराम देण्याची मागणी केली आहे. केवळ पडताळणीपुरते न थांबता थेट दोषींवर कठोर कारवाई करून हा प्रकार कायमचा संपवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.
Editer sunil thorat




