
डॉ गजानन टिंगरे
पुणे (इंदापूर) : इंदापूर तालुक्यातील मौजे लासुर्णे गावाला ऐतिहासिक वारसा लाभलेले श्री निलकंठेश्वर गणेश उत्सव मंडळ यंदाही समाजोपयोगी उपक्रमांमुळे विशेष ठरत आहे. तब्बल ७० ते ८० वर्षांचा परंपरागत वारसा लाभलेल्या या मंडळाने आतापर्यंत तीन वेळा शासनाचा “एक गाव, एक गणपती” हा बहुमान मिळवला आहे.
गावाच्या सामाजिक-सांस्कृतिक जीवनात अग्रणी स्थान मिळवलेले हे मंडळ दरवर्षी गणेशोत्सव काळात नवनवीन उपक्रम राबविते. यावर्षीही मंडळाने विद्यार्थ्यांच्या गुणवंत सन्मानापासून विविध स्पर्धांपर्यंत समृद्ध कार्यक्रमांची आखणी केली आहे. दहावी व बारावी परीक्षेत पहिल्या तीन क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करून शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरीला प्रोत्साहन दिले जाणार आहे.
तसेच लहान मुलांसाठी नृत्यस्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, घरच्या गणपतीचे उत्कृष्ट देखावे या स्पर्धेद्वारे समाजाला उपदेश करणारे संदेशवहन, होम मिनिस्टर सारखा महिलांसाठी खास कार्यक्रम अशी बहुरंगी उपक्रमांची मेजवानी देण्यात येणार आहे. उत्सवाच्या अखेरीस भव्य महाप्रसादाचे आयोजन करून सर्व ग्रामस्थांना एकत्र आणले जाणार आहे.
वारशाला साजेसा आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा गणेशोत्सव गावाच्या सामाजिक एकतेचे प्रतीक ठरत असल्याचे मत ग्रामस्थ व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
Editer sunil thorat





