विश्वशांती दर्शन वाहिनीच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त विचारमंथन, जागतिक शांततेसाठी मानवता सर्वात महत्वाची ; सुनील शास्त्री

पुणे : “मानवतेचा प्रचार करायचा असेल तर मानवता अंगीकारणे सर्वात महत्वाचे आहे. जर मानवता नसेल तर जागतिक शांती कशी येईल? आजच्या काळात प्रत्येक व्यक्ती शांती विसरला आहे. त्यामुळे जयपूरमध्ये भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांच्या नावाने विश्वधर्म संग्रहालय उभारून जागतिक शांतीचा नारा दिला जाईल,” असे विचार माजी राज्यसभा सदस्य आणि भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांचे सुपुत्र सुनील शास्त्री यांनी व्यक्त केले.
ते माइर्स एमआयटी सुरू केलेल्या विश्वशांती दर्शन वाहिनीच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
कार्यक्रमातील मान्यवरांची उपस्थिती…
या कार्यक्रमास अॅड गुरू भारत दाभोळकर व श्रीमती शास्त्री सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी माइर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड होते. तसेच वाहिनीचे सीईओ डॉ. मुकेश शर्मा आणि प्रसिद्ध कवी डॉ. संजय उपाध्ये उपस्थित होते.
सुनील शास्त्रींच्या आठवणी व विचार…
“जय जवान, जय किसान हा नारा देऊन देश एकत्र आणणारे लाल बहादूर शास्त्री नेहमीच देशाच्या कल्याणाचा विचार करत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून डॉ. कराड यांनी जागतिक शांती हेच जीवनध्येय मानले आहे आणि विश्वशांती दर्शन वाहिनीद्वारे शांतीचा संदेश पसरवून सर्वांच्या मनात शांतीची बीजे पेरली आहेत,” असे सुनील शास्त्री म्हणाले.
बालपणीची आठवण सांगताना ते म्हणाले, “एकदा माझे वडील २१ दिवस मला भेटले नाहीत. मी रागावून विचारले तेव्हा त्यांनी सांगितले – भारत देश हेच माझे संपूर्ण कुटुंब आहे, त्यांची काळजी घेणे माझे कर्तव्य आहे. हाच विचार आज डॉ. कराड यांच्या कार्यातून दिसून येतो.”
‘वसुधैव कुटुंबकम’चा पाया…
स्वागतपर भाषणात डॉ. मुकेश शर्मा म्हणाले, “ही वाहिनी वसुधैव कुटुंबकम या तत्त्वावर उभी आहे. जगभरातील प्रत्येकाला शांती कशी मिळेल, यावर सतत प्रसारण केले जाते.”
त्यानंतर भारत दाभोळकर यांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून आपले विचार मांडले. यावेळी डॉ. कराड यांच्या जीवनकार्यावर आधारित लघुपट सादर करण्यात आला. विद्यार्थीनी संज्ञा उपाध्ये हिने सूत्रसंचालन केले तर डॉ. संजय उपाध्ये यांनी आभार मानले.
Editer sunil thorat






