कुत्र्याने चाटलं… पण दुर्लक्ष ठरलं घातक ; २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू…

उत्तरप्रदेश : उत्तर प्रदेशात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. फक्त मोकाट कुत्र्याने जखमेवर चाटल्यामुळे एका २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू झाला आहे. कुटुंबाच्या एका चुकीमुळे निरागस जीव अकाली निघून गेल्याने गावात शोककळा पसरली आहे.
शेतकरी मोहम्मद अनीस यांचा दोन वर्षांचा मुलगा मोहम्मद अदनान याच्या पायाला किरकोळ जखम झाली होती. सुमारे महिनाभरापूर्वी एका मोकाट कुत्र्याने त्याच्या पायावरील त्या जखमेवर चाटले होते. त्यावेळी घरच्यांनी ही गोष्ट गांभीर्याने घेतली नाही. “फक्त चाटल्यामुळे काही होणार नाही,” असा त्यांचा समज होता. पण हीच त्यांची सर्वात मोठी चूक ठरली.
रेबीज हा असा विषाणूजन्य आजार आहे की, तो कुत्र्याच्या चाव्यानेच नव्हे तर चाटल्यामुळेही शरीरात प्रवेश करू शकतो. काही दिवसांनी किंवा महिन्यांनी त्याची लक्षणे दिसू लागतात. अदनानच्या बाबतीतही असेच झाले. शनिवारी अचानक त्याला रेबीजची लक्षणे दिसू लागली. त्याला ‘हायड्रोफोबिया’ म्हणजेच पाण्याची भीती जाणवू लागली. प्रकृती झपाट्याने खालावल्याने कुटुंबीयांनी त्याला दवाखान्यात नेले. मात्र, योग्य उपचार न मिळाल्याने सोमवारी त्याचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर गावभर भीतीचे वातावरण पसरले आहे. चिमुकल्याच्या मृत्यूची गंभीरता लक्षात घेऊन जवळपास ३० गावकऱ्यांनी तातडीने सरकारी रुग्णालयात जाऊन अँटी-रेबीज लस घेतली.
डॉक्टरांचे स्पष्ट आवाहन आहे की, “कुत्रा, मांजर किंवा माकड चावले किंवा जखमेवर चाटले तरी त्याकडे कधीही दुर्लक्ष करू नये. तात्काळ जखम स्वच्छ धुवून अँटी-रेबीज लस घेणे अत्यावश्यक आहे. रेबीज हा जीवघेणा आजार असून, लस घेतल्यास तो पूर्णपणे टाळता येऊ शकतो.”
Editer sunil thorat




