
तुळशीराम घुसाळकर
पुणे (हवेली) : श्रीगणेश चतुर्थीनिमित्त थेऊर (ता. हवेली) येथील अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्री चिंतामणी देवाच्या दर्शनासाठी आज (दि. २७) पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी झाली होती. पहाटे पाच वाजता मंदिराचे दरवाजे उघडताच अजय आगलावे यांनी श्रींचा अभिषेक व महापूजा केली. त्यानंतर मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले करण्यात आले.
भाद्रपद गणेश द्वारयात्रेच्या पारंपरिक कार्यक्रमांतर्गत दुपारी ३.३० वाजता आगलावे बंधू व थेऊर ग्रामस्थांनी श्रींची पालखी काढली. पालखी प्रथम ग्रामदैवत महातारी आई मंदिरात नेण्यात आली. येथे पिरंगुटकर मंडळींनी भजन व पदे सादर केली. त्यानंतर पालखीने ग्रामप्रदक्षिणा करून पुन्हा चिंतामणी मंदिरात प्रवेश केला.
रात्री १० वाजता पिरंगुटकर व उरुळीकर मंडळींनी मंगलमूर्तीची पूजा केली. त्यानंतर आगलावे बंधूंनी श्रींना महापोषाख परिधान करून पालखी काढली. गुलालाची उधळण, टिपऱ्या व पारंपरिक पदगायनाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले. रात्रभर पदगायन सुरू राहिले. सकाळी देवाची दृष्ट काढून मटकी प्रसादाने चार दिवसांच्या उपवासाची सांगता झाली.
यापूर्वी प्रतिपदेपासून सुरू झालेल्या द्वारयात्रेत पिरंगुटकर देवमंडळी व ग्रामस्थांनी परंपरेनुसार विविध देवस्थानांना भेट देऊन श्रींना आमंत्रण दिले होते. पहिल्या दिवशी कोरेगाव मूळ येथील आसराई देवी, दुसऱ्या दिवशी आळंदी येथील ओझराई माता, तिसऱ्या दिवशी मांजरी येथील मांजराई माता आणि चौथ्या दिवशी थेऊर येथील महातारी आई येथे यात्रा पार पडली.
गुरुवारी श्री चिंतामणीची महापूजा व छत्तीस भोगांचा नैवेद्य दाखवून मोरया गोसावी महाराजांनी रचलेल्या पदांद्वारे उत्सवाचा मुख्य सोहळा संपन्न झाला. या वेळी श्री चिंचवड देवस्थानचे विश्वस्त केशव विध्वंस उपस्थित होते.
Editer sunil thorat




