मराठा आरक्षण मोर्चासाठी ५० हजार बांधवांसाठी गुलमोहर लॉन्सवर चहा-नाष्टा, जेवण व निवासाची भव्य सोय…

पुणे (हवेली) : मराठा आरक्षणाच्या हक्कासाठी काढण्यात येणाऱ्या भव्य मोर्चात सहभागी होणाऱ्या समाज बांधवांसाठी पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाठ टोल नाका येथे गुलमोहर लॉन्सवर भोजन, नाष्टा, आंघोळ व निवासाची भव्य सोय करण्यात आली. या उपक्रमामुळे हजारो बांधवांना प्रवासातील थकवा दूर करून नव्या उत्साहाने मोर्चात सहभागी होता आले.
या आयोजनाचे मार्गदर्शन पुणे जिल्हा संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष उत्तम कामठे यांनी केले. त्यांच्यासह हनुमंतराव मोटे, संतोष देशमुख, तेजस देशमुख, बालाजी देशमुख, आण्णा पाटील व स्थानिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत सुमारे ६० ते ७० कार्यकर्त्यांनी हे आयोजन यशस्वी केले.
आयोजकांच्या माहितीनुसार, गुलमोहर लॉन्सवर जवळपास ५० हजार मराठा बांधवांसाठी चहा-नाष्टा व जेवणाची व्यवस्था करण्यात आली. यासोबतच समाज बांधवांच्या सोयीसाठी आंघोळ व विश्रांतीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली. या सेवेमुळे प्रवासाने दमलेल्या कार्यकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला.
दरम्यान, लातूर, सोलापूर, अक्कलकोट, धाराशिव आदी भागांतून पुण्याकडे येणाऱ्या हजारो समाज बांधवांचे कवडीपाठ टोल नाका येथे जोरदार स्वागत करण्यात आले. स्थानिक ग्रामस्थ व आयोजकांनी केलेल्या उत्तम व्यवस्थेमुळे सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिल्याचे समाधान उपस्थित बांधवांनी व्यक्त केले.
मराठा आरक्षणाच्या हक्कासाठी समाजातील सर्व स्तरातून अशा पद्धतीने केलेल्या सामूहिक प्रयत्नांमुळे समाजाची एकजूट व ताकद अधोरेखित होत असल्याचे यावेळी प्रकर्षाने जाणवले.
Editer sunil thorat





