उरुळी कांचनला स्वतंत्र अग्निशमन केंद्र ; पीएमआरडीएकडून ११ कोटींचा निधी…

पुणे : पूर्व हवेली, दौंड व पुरंदर परिसरातील वाढत्या आग दुर्घटनांवर नियंत्रणासाठी उरुळी कांचन (ता. हवेली) येथे पीएमआरडीएच्या वतीने स्वतंत्र अग्निशमन केंद्र उभारण्यात येणार आहे. या कामासाठी तब्बल ११ कोटी ४ लाख २९ हजार ७६० रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य व यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष कांचन यांनी दिली.
हे अग्निशमन केंद्र ग्रामपंचायत हद्दीतील कांचन सिटी येथील दोन एकर जागेत उभारण्यात येणार असून लवकरच निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे. पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे व अग्निशमन विभागप्रमुख देवेंद्र पोटफोडे यांनी बुधवारी (दि. २६) उरुळी कांचन येथे पाहणी केली.
गेल्या अनेक वर्षांपासून संतोष कांचन यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून परिसरातील व्यापारी व नागरिकांतून त्यांचे कौतुक होत आहे.
सध्या परिसरात आग लागल्यास वाघोली किंवा हडपसर येथून अग्निशमन बंब बोलवावा लागत होता. त्यामुळे उशीर होऊन मोठे आर्थिक नुकसान होत असे. मात्र, नव्या केंद्रामुळे दुर्घटनांवर तातडीने उपाययोजना करता येणार असून हानी कमी होईल.
पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, थेऊर, कुंजीरवाडी, उरुळी कांचन या भागात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक व शहरी विकास होत असल्याने हे केंद्र अत्यावश्यक होते.
“उरुळी कांचन येथे अग्निशमन केंद्राच्या उभारणीमुळे पूर्व हवेली, दौंड, पुरंदर परिसरातील दुर्घटनांवर तातडीने आळा बसणार आहे. पीएमआरडीएद्वारे उभारण्यात येणारे हे केंद्र सर्व सोयींनी सुसज्ज असेल.”
– संतोष कांचन, संचालक, यशवंत सहकारी साखर कारखाना, थेऊर
Editer sunil thorat




