
पुणे : शिक्षण नगरी पुण्यातील कोंढव्यात घडलेली एक हृदयस्पर्शी घटना समाजाला धक्का देणारी आणि त्याचवेळी आशेचा किरण दाखवणारी ठरली आहे. आईने भीक मागायला रस्त्यावर उभं केलेल्या तीन बहिणींना पोलिसांच्या दामिनी मार्शलने पुन्हा शाळेच्या दारात नेऊन बसवलं. त्यामुळे तीन निरागस जीवांचं आयुष्य अंधारातून प्रकाशाकडे वळलं आहे.
कोंढव्यातील शाळेतील एक हुशार विद्यार्थिनी अचानक अनुपस्थित राहू लागल्याचे मुख्याध्यापकांच्या लक्षात आले. त्यांनी थेट दामिनी मार्शल आयोध्या चेचर यांच्याशी संपर्क साधला. मुलीच्या घरी पोहोचल्यावर हृदय पिळवटून टाकणारे वास्तव समोर आले. घरात बंदिस्त झालेल्या तीन बहिणींनी अश्रू ढाळत आपली व्यथा सांगितली.
“आमच्या आईने आम्हाला शाळेत न पाठवता भीक मागायला लावलं. मलाही शाळेत जाऊन शिकायचं आहे…” अशी आर्त विनवणी ऐकून दामिनी मार्शलही हेलावल्या.
काही दिवस मुलींच्या आईवर लक्ष ठेवून पुरावे गोळा करण्यात आले. पोलिस स्टेशनमध्ये तिला आणून कठोर समज देण्यात आली. त्यानंतर पोलिस, शाळा व समाजोपयोगी संस्थांच्या मदतीने मुलींना पुन्हा शाळेत दाखल करण्यात आले.
संवेदनशीलतेचा विजय…
या कार्यामागे वरिष्ठ निरीक्षक विनय पाटणकर, गुन्हे निरीक्षक वर्षा देशमुख आणि दामिनी मार्शल आयोध्या चेचर यांचे विशेष प्रयत्न आहेत. त्यांच्या संवेदनशील व ठाम भूमिकेमुळे या मुलींना नवे आयुष्य मिळाले.
“बेटी बचाव, बेटी पढाव ही योजना फक्त घोषणांपुरती न राहता प्रत्यक्षात उतरली, हेच खरं समाधान आहे,” असे आयोध्या चेचर यांनी सांगितले.
‘मी त्यांना सोडून नाही राहू शकत’ – बहिणीची हृदयस्पर्शी हाक
आठवीत शिकणाऱ्या मुलीने पोलिसांना सांगितले – “माझ्या दोन बहिणी आणि दोन वर्षांचा भाऊ आहे. आम्हाला कुठल्या संस्थेत पाठवलं, तर एकत्र राहायला मिळणार नाही. मी त्यांना सोडून नाही राहू शकत. तुम्ही आईला सांगा, आम्हाला नीट सांभाळायला.”
या निरागस हाकेला प्रतिसाद देत पोलिसांनी मुलांच्या भविष्याचा विचार करून योग्य देखरेखीत त्यांना सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था केली आहे.
Editer sunil thorat




