
हडपसर (पुणे) : | ६ सप्टेंबर २०२५ रयत शिक्षण संस्थेचे एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि भूगोलशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जन व निर्माल्य संकलन उपक्रम राबविण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.
या उपक्रमामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. ज्योती किरवे, भूगोलशास्त्र विभागाचे डॉ. बाळासाहेब माळी, प्रा. दीपक गायकवाड यांच्यासह महाविद्यालयातील स्वयंसेवकांनी उत्साहाने सहभाग घेतला.
नगरपालिकेच्या सहकार्याने विसर्जन घाटांवर निर्माल्य संकलन केंद्रे उभारण्यात आली. नागरिकांना फुले, हार, माळा, पत्री थेट नदीत टाकण्याऐवजी संकलन पेट्यांमध्ये टाकण्याचे आवाहन करण्यात आले. भक्तांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत निर्माल्य संकलन पेट्यांमध्ये अर्पण केले.
स्वयंसेवकांनी घोषवाक्ये, पत्रके आणि जनजागृती मोहिमेद्वारे नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. विसर्जनासाठी आलेल्या लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच त्यांनी मार्गदर्शन केले. संकलित फुलांपासून सेंद्रिय खत व उपयुक्त वस्तू तयार करण्याची योजना असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली.
या उपक्रमामुळे विसर्जन घाट स्वच्छ राहिले तसेच पाण्याचे प्रदूषण टाळण्यात मदत झाली. स्वयंसेवकांच्या पुढाकाराचे नागरिकांनी कौतुक केले असून, “एस. एम. जोशी कॉलेजच्या स्वयंसेवकांनी घेतलेला पर्यावरणपूरक उपक्रम आदर्शवत आहे,” असे मत अनेकांनी व्यक्त केले.
Editer sunil thorat





