
हडपसर (पुणे) : रयत शिक्षण संस्थेचे एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर येथील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने गुरुवार (दि. ४ सप्टेंबर २०२५) रोजी “स्पर्धा परीक्षांमधील यश आणि आव्हाने” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून यवतमाळ जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी गंगाधर होवाळे तर अध्यक्षस्थानी एस. एम. जोशी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना उपजिल्हाधिकारी गंगाधर होवाळे म्हणाले की, “स्पर्धा परीक्षेत हमखास यश मिळवायचे असेल तर सातत्यपूर्ण व नियोजनबद्ध अभ्यास अत्यावश्यक आहे.” ते पुढे म्हणाले की, “घरची आर्थिक परिस्थिती साधारण असली तरी मी या महाविद्यालयात कॉमर्स विभागातून शिक्षण घेतले आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातून प्रेरणा घेतली. महाविद्यालयाच्या वाचन कक्ष व ग्रंथालयाच्या मदतीने मी दहा-बारा तास अभ्यास करू शकलो. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास खडतर आहे; मात्र सातत्य ठेवले तर यश निश्चित मिळते.”
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, “महाविद्यालयातील मार्गदर्शन केंद्रातून अनेक विद्यार्थ्यांनी दैदीप्यमान यश मिळवले असून उपजिल्हाधिकारी गंगाधर होवाळे हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श ठेवून तयारी करावी.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय डॉ. छाया सकटे यांनी केले. समन्वयक प्रा. अजित भोसले यांनी आभार मानले, तर प्रा. दीपक गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दिनकर मुरकुटे तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Editer sunil thorat




