भूमी अभिलेखचे तत्कालीन जिल्हा अधीक्षक सूर्यकांत मोरे निलंबित ; विभागात खळबळ…

तुळशीराम घुसाळकर
पुणे : चौकशी समितीच्या अहवालानंतर शासनाने भूमी अभिलेख विभागातील मोठी कारवाई करत पुण्यातील तत्कालीन जिल्हा अधीक्षक आणि सध्या उपसंचालक (पुणे एकत्रीकरण) सूर्यकांत मोरे यांना निलंबित केले आहे. शुक्रवारी (५ सप्टेंबर) सायंकाळी उशिरा शासनाने त्यांचा निलंबन आदेश जारी केला असून या निर्णयाने विभागात एकच खळबळ उडाली आहे.
मोरे यांच्या जिल्हा अधिक्षकपदावरील कार्यकाळात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचे उघड झाले होते. हवेली उपअधीक्षक कार्यालय व पुणे जिल्हा अधीक्षक कार्यालयातील कारभाराबाबत तक्रारी आल्यानंतर शासनाने चौकशी समिती नियुक्त केली होती. या समितीच्या तपासणीत गंभीर अनियमितता स्पष्ट झाली.
यापूर्वीच हवेलीचे तत्कालीन उपअधीक्षक अमरसिंह पाटील यांना अनियमिततेच्या प्रकरणात निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर सूर्यकांत मोरे यांच्यावर कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर शासनाने गंभीर बाबींची दखल घेत त्यांचे निलंबन केले आहे.
मोरे यांच्या विरोधात महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ च्या नियम ८ अन्वये विभागीय चौकशी सुरू करण्यात आली असून, या कारवाईमुळे भूमी अभिलेख विभागातील कारभार स्वच्छ करण्याच्या दिशेने शासनाने पाऊल टाकल्याचे मानले जात आहे.
Editer sunil thorat



