परित्यक्ता महिलेवर लॉजवर बलात्कार; शादी डॉट कॉमवरून झाली ओळख…

तुळशीराम घुसाळकर
पुणे (ता.हवेली) : हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील एका लॉजवर परित्यक्ता महिलेवर जबरदस्तीने बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घरगुती वादांमुळे पतीपासून वेगळी राहणाऱ्या महिलेची शादी डॉट कॉम या साईटवर आरोपीशी ओळख झाली होती. विश्वास संपादन करून एकांतात भेटायला बोलावून त्याने बलात्कार केल्याचे उघड झाले आहे.
याप्रकरणी पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून लोणी काळभोर पोलीस ठाण्यात चंद्रकांत दिनकर थोरात (वय ३०, रा. चाकण, पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिडीत महिला विवाहित असून दोन मुलींसोबत राहते. पतीपासून वेगळी राहिल्यानंतर घटस्फोट घेऊन दुसरे लग्न करण्याचा तिचा विचार होता. त्यामुळे ती शादी डॉट कॉम या साईटवर जोडीदार शोधत होती. याद्वारे तिची आरोपी चंद्रकांत दिनकर थोरात याच्याशी ओळख झाली.
२४ ऑगस्ट रोजी दुपारी आरोपीने बोलण्याचा बहाणा करून उरुळी कांचन येथे पिडीतेला भेटायला बोलावले. त्यानंतर दुचाकीवर बसवून तिला कुंजीरवाडीतील लॉजवर नेले. तेथे जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले. पुढे वारंवार फोन करून तो पिडीतेस धमक्या देत शारिरीक सुखाची मागणी करत होता.
शेवटी कंटाळून पिडीतेने पोलिस ठाण्यात धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के पुढील तपास करीत आहेत.
Editer sunil thorat



