
कदमवाकवस्ती /पुणे : ढोल-ताशांच्या गजरात, गुलालाच्या उधळणीत आणि शेकडो विद्यार्थ्यांच्या जल्लोषात एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी (एमआयटी एडीटी) विद्यापीठाच्या गणेशोत्सवाचा समारोप झाला. रविवारी विद्यापीठातील विसर्जन घाटावर लाडक्या बाप्पाला भावूक निरोप देण्यात आला.
यंदाचा गणेशोत्सव विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड यांच्या हस्ते गणपतीची विधिवत प्रतिष्ठापना करून सुरू झाला होता. प्रतिष्ठापनेनंतर प्रत्येक दिवशी विद्यार्थ्यांकडून विविध सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये नृत्याविष्कार, संगीत सादरीकरण, नाटकं तसेच विविध स्पर्धांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कार्यक्रमांना प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.
विसर्जन मिरवणुकीची सुरुवात इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनच्या प्रांगणातून झाली. विद्यार्थ्यांच्या ‘शिवराय’ या पारंपरिक ढोलपथकाच्या जोशपूर्ण वादनाने संपूर्ण परिसर दुमदुमला. मिरवणुकीला विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. महेश चोपडे, क्रीडा विभागाचे संचालक प्रा. पद्माकर फड, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. सुराज भोयार यांच्यासह विविध विभागांचे प्राध्यापक उपस्थित होते.
या प्रसंगी विद्यार्थ्यांनी काही क्षणांतच रंगीत चित्रं रेखाटून आपली कला सादर केली. रंगांचा उत्सव आणि ढोल-ताशांचा जल्लोष यामध्ये अखेर विद्यार्थ्यांनी गुलालाची उधळण करत गणपती बाप्पाला निरोप दिला. विद्यापीठाच्या घाटावर एकत्रितपणे झालेल्या विसर्जन सोहळ्याने उपस्थित सर्वांना भावूक केले.
एमआयटी एडीटी विद्यापीठात पारंपारिकतेसोबतच विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा मिलाफ अनुभवायला मिळाल्याने यंदाचा गणेशोत्सव सर्वांसाठी संस्मरणीय ठरला.
Editer sunil thorat



