राजकीयसामाजिक

दिवाळीत निवडणुकीचे वातावरण तापणार; राज्य सरकारने जाहीर केले वेळापत्रक ; वाचा सविस्तर…

संपादक सुनिल थोरात

पुणे : राज्य सरकारने महापालिकांच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश दिल्यानंतर आज (ता.१२) प्रभाग रचना तयार करण्यासाठीचे वेळापत्रक तयार केले आहे. ११ जून पासून प्रारूप प्रभाग रचना तयार होणार आहे.

त्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण करून ४ सप्टेंबरपर्यंत अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या काळात महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम शिगेला पोचण्याची शक्यता आहे.

गेल्या सव्वातीन वर्षापासून महापालिकेच्या निवडणुका रखडल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे राज्य सरकारने निवडणुकीची प्रक्रिया सुरु केली आहे. दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने पुण्यात चार सदस्यांचा प्रभाग होणार असल्याचे निश्चित केले व त्यानुसार प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश महापालिकेला दिले.

पण यासाठीचे वेळापत्रक जाहीर नसल्याने प्रशासनासमोर पेच निर्माण झाला होता. याबाबत आज ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. सरकारने हे वेळापत्रक जाहीर केल्यामुळे याबाबतचा संभ्रम दूर झाला आहे.

प्रारूप प्रभाग रचनेसाठी प्रगणक गटांची मांडणी करण्याचे १६ जून पर्यंत पूर्ण करायचे आहे. त्यानंतर जनगणनेची माहिती तपासणे, प्रत्यक्ष स्थळ पाहणी करणे, गुगल मॅपवर नकाशे तयार करणे, नकाशावर निश्चित केलेल्या हद्दी प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणे, प्रभाग समितीच्या मसुद्यावर निवडणूक समितीच्या सदस्यांनी स्वाक्षरी करून प्रारूप प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाला सादर केली जाणार आहे.

या प्रक्रियेसाठी एका महिन्याची मुदत आहे. निवडणूक आयोगाने प्रारूप प्रभाग रचनेस मान्यता दिल्यानंतर हा आराखडा जाहीर करून त्यावर हरकती सूचना मागविल्या जाणार आहेत. त्यासाठी १० दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.

पुढील ११ दिवसात सुनावणी घेऊन प्रभाग रचना अंतिम करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे हा आराखडा पाठविला जाईल. त्यानंतर योग्य ते बदलास निवडणूक आयोगाकडून मान्यता दिल्यानंतर २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत प्रभाग रचनेची अधिसूचना जाहीर केली जाईल.

उमेदवारांना दिवाळीचा ‘फराळ’ वाटावा लागणारच…

सप्टेंबर महिन्यात प्रभाग रचना अंतिम होणार आहे. आयोगाच्या आदेशानुसार ठरवीत दिवशी त्यातील अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, महिला या आरक्षणाच्या सोडती काढल्या जातील. त्यानंतर कोणता प्रभाग खुल्या गटासह, ओबीसी, एसटी, एसीच्या पुरुषांसाठी आहे, महिलांसाठी आहे हे निश्चित होईल. ही प्रक्रिया होण्यासाठी ऑक्टोबर महिना उजाडेल.

त्यानंतर निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होईल. ती किमान ४५ दिवसांची असते. ऑक्टोबरच्या अखेरीस दिवाळी असणार आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीसाठी दिवाळीपूर्वी मतदान होणार की नंतर हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे. पण मतदान कधीही झाले तरी उमेदवारांना प्रभागात दिवाळीचा ‘फराळ’ वाटप करावा लागणार आहेच.

                     असे आहे वेळापत्रक

प्रगणक गटांची मांडणी करणे ११ ते १६ जून

जनगणनेची माहिती तपासणे – १७ ते १८ जून

स्थळ पाहणी – १९ ते २३ जून

गुगल मॅपवर नकाशे तयार करणे २४ ते ३० जून

नकाशावर निश्चित केलेल्या हद्दी प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणे – १ ते ३ जुलै

प्रभाग समितीच्या मसुद्यावर सदस्यांनी स्वाक्षऱ्या करणे -४ ते ७ जुलै

प्रारूप प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाला सादर करणे – ८ ते १० जुलै

प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करणे व हरकती सूचना मागविणे – २२ जुलै ३१ जुलै

हरकती सूचनांवर सुनावणी घेणे १ ते ११ ऑगस्ट

प्रभाग रचनेतील बदलांसह अंतिम प्रभाग रचना मान्यतेसाठी आयोगाकडे पाठविणे १२ ते १८ ऑगस्ट

निवडणूक आयोगाने मान्य केलेली प्रभाग रचना जाहीर करणे – २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??