इंदापुरात थरार! रस्त्याच्या कडेला सापडला माणसाचा पायाचा भाग — गाड्या थांबल्या, लोकांची तंतरली, पोलिसांचा तपास सुरू…

डॉ गजानन टिंगरे
इंदापुर (जि. पुणे) : राज्यात गुन्हेगारीच्या आणि हिंसक घटनांच्या मालिकाच सुरू असताना, आता पुणे जिल्ह्यातील इंदापुर तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली आहे. कळंब–निमसाखर मार्गावर रस्त्याच्या कडेला माणसाच्या डाव्या पायाचा गुडघ्याखालचा भाग आढळून आला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सकाळी उघडकीस आला भयानक प्रकार…
ही घटना बुधवारी (१२ नोव्हेंबर) सकाळी सुमारास उघडकीस आली. कळंब गावाच्या हद्दीत असलेल्या एका हॉटेलपासून सुमारे ५०० ते ७०० मीटर अंतरावर रस्त्याच्या कडेला पुरुष जातीचा डाव्या पायाचा अर्धा भाग पडलेला असल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. सुरुवातीला काहींना तो प्राण्याचा अवयव असल्याचा भास झाला. पण जवळ गेल्यानंतर तो मानवी अवयव असल्याचे स्पष्ट होताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
गाड्या थांबल्या, नागरिकांची तंतरली…
ही माहिती समजताच परिसरात गोंधळ उडाला. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांनी गाड्या थांबवून गर्दी केली. काहींनी त्वरित पोलिसांना माहिती दिली. काही वेळासाठी त्या भागात वाहतुकीचीही कोंडी झाली.
स्थानिकांच्या मते, “पायाचा भाग पाहून कोणाचंही हृदय दचकेल. अशी घटना कधीच पाहिली नव्हती,” अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.
पोलिसांची तत्काळ धाव; सखोल तपास सुरू…
घटनेची माहिती मिळताच वालचंदनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी त्या ठिकाणी पंचनामा करून परिसर सील केला आहे. सदर पायाचा भाग गुडघ्याखालचा असून त्यावर गंभीर जखमा व रक्ताचे ठसे आढळले आहेत. त्यामुळे हा प्रकार घातपाताचा असल्याची शक्यता पोलिसांकडून नाकारली गेलेली नाही.
पोलिसांनी आसपासच्या सीसीटीव्ही फुटेजचा शोध सुरू केला असून जवळपास हरवलेल्यांची माहिती तपासली जात आहे.
तज्ज्ञांचा सहभाग; फॉरेन्सिक तपासही सुरू…
या घटनेचा तपास आता फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीने केला जात आहे. तज्ज्ञांकडून पायाच्या भागावरून ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच डीएनए तपासणीसाठी नमुना पाठवला जाणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. पायाचा भाग इतरत्रून आणून येथे टाकण्यात आला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
परिसरात भीतीचं वातावरण…
या प्रकारानंतर कळंब गाव परिसरात भीतीचं सावट पसरलं आहे. नागरिकांच्या मनात भीती असून अनेकांनी रात्री रस्त्यांवर जाणं टाळलं आहे. पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली असून लोकांना अफवा न पसरवण्याचं आवाहन केलं आहे.
“हा पाय नेमका कुणाचा? घातपात, अपघात की काही वेगळं?” — पोलिसांचा तपास सुरू, संपूर्ण इंदापुरात चर्चेचा विषय! वालचंदनगर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी तळ ठोकून तपास वेगात करत आहे.
Editer sunil thorat



