
पुणे : प्राचीन काळातील प्रकाशित नसलेले ज्ञान व संदर्भ नागरिकांसमोर आणून त्याचे जतन व संवर्धन करण्याचे कार्य डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्थेने करावे, अशी सूचना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केली.
डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था येथे आयोजित भारतीय ज्ञान प्रणाली-दृश्यश्रव्य कक्ष आणि ‘पुनः’ छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी, डेक्कन कॉलेजचे कुलगुरु डॉ. प्रसाद जोशी, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, डॉ. सोनल कुलकर्णी-जोशी, प्रा. शाहिदा अन्सारी, डॉ. बन्सी लव्हाळे आणि सुहाणा उद्योग समूहाचे आनंद चोरडिया उपस्थित होते.
राज्यपालांनी मंदिरे, जुनी नाणी, हस्तलेख, संस्कृत शब्दकोश प्रकल्प यांसारख्या वारसा जतन प्रकल्पांचे कौतुक केले. तसेच पुरातत्व विभागाच्या मराठा इतिहास आणि पुरातत्व संग्रहालय संगणकीकरण प्रकल्पासाठी प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली व त्यास सहकार्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमापूर्वी राज्यपालांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे विद्यार्थी जीवनातील वास्तव्यस्थळ पाहून माहिती घेतली. डॉ. जोशी यांनी संस्थेच्या संस्कृत कोशप्रणाली आणि मराठी बोलीभाषा सर्वेक्षण प्रकल्पाबद्दल माहिती दिली. प्रा. अन्सारी यांनी पुरातत्व विभागाच्या संशोधन व मंदिर सर्वेक्षण कार्याची माहिती दिली. आनंद चोरडिया यांनी ‘पुनः’ या छायाचित्र प्रदर्शनाच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा दर्शविणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली.
Editer sunil thorat





