बाईच्या नादानं उपसरपंचाचा अंत!नर्तिकेच्या नादी लागला, सोनं–नाणं, जमीन-जुमला लुटलं ; अखेर स्वतःवरच गोळी झाडली…

गेवराई (बीड) : नर्तिकेच्या नादाने माजी उपसरपंचाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेवराई तालुक्यातील लखामसला येथील माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे (वय 38) यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, या प्रकरणी नर्तिका पूजा देविदास गायकवाड हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नातं, जवळीक आणि ब्लॅकमेलची मालिका…
गोविंद बर्गे हे जमीन खरेदी–विक्रीचा व्यवसाय करत होते. याच दरम्यान त्यांची ओळख पारगाव थिएटरमध्ये नृत्य करणाऱ्या पूजाशी झाली. सुरुवातीला साधी ओळख असलेलं नातं लवकरच जवळीकतेत बदललं. बर्गे यांनी तिच्यावर अक्षरशः धनाचा वर्षाव केला. सोनं–नाणं, दागिने, शेतजमीन, अगदी पावणे दोन लाखांचा मोबाईलही पूजाला खरेदी करून दिला होता.
परंतु या ओळखीचा फायदा घेत पूजाने वारंवार बर्गे यांना पैशांसाठी ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. “जर शेतजमीन नावावर केली नाही तर बलात्कार प्रकरण उघड करीन,” अशा धमक्या देऊन ती त्यांना मानसिक त्रास देत होती. यामुळे उपसरपंच प्रचंड तणावाखाली होते.
शेवटी घेतला जीवघेणा निर्णय…
सततच्या ब्लॅकमेलिंगमुळे आणि मानहानीच्या भीतीने अखेर बर्गे यांनी स्वतःवर गोळी झाडली. घटनास्थळावरून पोलिसांनी बंदूक आणि इतर साहित्य जप्त केले असून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.
खून की आत्महत्या?
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बर्गे यांनी आत्महत्या केली की त्यांचा खून झाला, याविषयी चर्चांना उधाण आले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, उपसरपंचाच्या कुटुंबाने नर्तिकेवर गंभीर आरोप करत तिला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.
Editer sunil thorat



