पुणे : मकर संक्रांत म्हणजे स्नेह, जिव्हाळा आणि आपुलकी वाढवणारा सण. हा सण मंगळवारी (दि.१४) उत्साहात, आनंदात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने घराघरांमध्ये तयारीला सुरुवात झाली असून, सणाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच सोमवारी (दि.१३) खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये लगबग पाहायला मिळाली.
उपनगरासह खरेदीसाठी मंडई, रविवार पेठ, लक्ष्मी रस्ता, तुळशीबागेत पुणेकरांनी गर्दी केली. पूजेच्या साहित्यांपासून ते तिळगूळ खरेदीपर्यंत, फुलांच्या खरेदीपासून ते सुगड खरेदीपर्यंत महिला-तरुणींनी खरेदीचे निमित्त साधले. रांगोळी, लहान मुलांच्या बोरन्हाणसाठी लागणारे दागिने आणि हलव्याच्या दागिन्यांचीही खरेदी जोमाने करण्यात आली. त्याशिवाय रविवार पेठेत पतंग खरेदीसाठीही लगबग दिसून आली. सगळीकडे हर्षोल्हासाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
नववर्षाच्या आगमनानंतरचा पहिला सण म्हणजेच मकर संक्रांत. ‘तिळगूळ घ्या गोड गोड बोला,’ असे म्हणत एकमेकांसोबत आपुलकीचे, जिव्हाळ्याचे नाते दृढ केले जाते. घराघरांत आनंद बहरतो अन् सगळेजण एकत्र येऊन सण साजरा करतात. यंदाही मंगळवारी प्रसन्न वातावरणात हा सण साजरा केला जाणार असून, यानिमित्ताने मंदिरांमध्ये धार्मकि कार्यक्रम होणार आहेत. मंदिरे दिवसभर दर्शनासाठी खुली राहणार आहेत.
संस्था-संघटनांच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले असून, ठिकठिकाणी तिळगूळ समारंभ होणार आहेत. घराघरांमध्ये पारंपरिक वेशभूषेत विधिवत पद्धतीने पूजाअर्चा करून एकमेकांसोबत हा सण आनंदाने साजरा केला जाईल. घरोघरी पंचपक्वानांचा बेत आखला जाणार असून, एकमेकांना तिळगूळ देऊन स्नेहाचे, आनंदाचे बंध जोडण्यात येणार आहेत.
या सणाच्या निमित्ताने सोमवारी (दि.१३) ठिकठिकाणच्या बाजारपेठांमध्ये खरेदीची लगबग दिसून आली. महिला-तरुणींनी सुगड, गाजर, बोरे, उसाची पेरे, शेंगा, कापूस, हरभरे, पाच फळे, तिळगूळ तसेच हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमासाठी लागणारे वाण, पूजेचे साहित्य आणि पूजेसाठी लागणार्या फुलांची खरेदी केली.
लहान मुलांसह तरुणांनी रविवार पेठेत पतंग खरेदीचे निमित्त साधले. तिळाची वडी, तिळाचे लाडू, गुळाच्या वड्या, तिळाचा हलवा याच्या खरेदीसाठीही दुकानांमध्ये लगबग पाहायला मिळाली, तर हलव्याच्या दागिन्यांसह लहान मुलांच्या बोरन्हाणसाठी लागणार्या विविध प्रकारच्या दागिन्यांसह रांगोळीची खरेदी करण्यात आली. मकर संक्रांतसाठी नवीन कपडे आणि त्याला साजेसे दागिनेही तरुणींनी तुळशीबाग आणि लक्ष्मी रस्त्यावरून खरेदी केले.
पूजेच्या साहित्यांमध्ये कापूर, दिवे, वात, हळदी-कुंकू, अगरबत्ती अशा विविध साहित्यांच्या खरेदीसह मंडईमध्ये असलेल्या विक्रेत्यांकडून सुगड, विविध भाज्या, तिळगूळ खरेदी करण्यात आले. सायंकाळी बाजारपेठांमध्ये खरेदीचा उत्साह अन् चैतन्य पाहायला मिळाले. भोगीसाठीही लोकांनी साहित्यांची खरेदी केली.
सारिका गायकवाड म्हणाल्या, मकर संक्रांतीच्या खरेदीसाठी मंडईत आले होते. पूजेच्या साहित्यांसह तिळगूळ खरेदी केले. तसेच, नवीन कपड्यांची खरेदीही केली. सणानिमित्त तयारी पूर्ण झाली आहे.
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा