पुण्यातील डॉक्टरांनी जपला माणुसकीचा आदर्श, सोलापूर पूरग्रस्तांना AMC पुणेचा मदतीचा हात…
अवघ्या चार दिवसांत पूरग्रस्तांसाठी दोन लाखांची मदत जमा...

पुणे : “जगात दोनच धर्म श्रेष्ठ – माणूस धर्म आणि शेजार धर्म,” या विचाराचं उत्तम उदाहरण पुण्यातील डॉक्टरांनी घालून दिलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पसलेवाडी व बोपली या गावांवर अलीकडच्या अतिवृष्टीमुळे आणि सीना नदीच्या पुरामुळे मोठं संकट आलं. शेकडो कुटुंबं विस्थापित झाली, जनजीवन विस्कळीत झालं. अशा परिस्थितीत पुण्यातील AMC (Association of Medical Consultants), Pune या डॉक्टरांच्या संघटनेने पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला.
AMC पुणेने सभासदांना आवाहन केल्यानंतर अवघ्या चार दिवसांत दोन लाख रुपयांची मदत जमा झाली. यामध्ये रोख रक्कम तसेच जीवनावश्यक साहित्याचा समावेश होता. या उपक्रमाला हडपसर मेडिकल असोसिएशनने देखील मोलाची साथ दिली.
मदतीच्या किटमध्ये टूथब्रश, टूथपेस्ट, कपड्यांचा साबण, खाद्यतेल, साखर, गहू पीठ, डाळ, तांदूळ, चहा पावडर, दूध पावडर, शेंगदाणे, मीठ इत्यादी वस्तू होत्या. एकूण १०० किट्स तयार करून त्यासोबतच २०० ब्लँकेट्स खरेदी करण्यात आली. दि. १ ऑक्टोबर रोजी हे साहित्य थेट गावी पोहोचवून सुमारे २०० कुटुंबांना मदत करण्यात आली.
स्थानिक नागरिकांनी पुण्यातील डॉक्टरांच्या संवेदनशील मदतीचं मनापासून कौतुक केलं. या उपक्रमात AMC चे अध्यक्ष डॉ. हनुमंत साळे, सेक्रेटरी डॉ. रोशनी कवले, खजिनदार डॉ. चेतन म्हस्के, नियोजित अध्यक्ष डॉ. साधना धर्माधिकारी, उपाध्यक्ष डॉ. विजय पवार, HMA अध्यक्ष डॉ. मनोज कुंभार यांचं मोलाचं सहकार्य लाभलं.
विशेष म्हणजे या संपूर्ण मदत उपक्रमाचं काटेकोर नियोजन निखिल शिंदे आणि त्यांच्या मित्रपरिवाराने केलं, ज्यामुळे मदत योग्य वेळी योग्य ठिकाणी पोहोचली.
AMC पुणे, हडपसर मेडिकल असोसिएशन आणि सर्व दानशूर व्यक्तींना मनःपूर्वक आभार मानण्यात आले. “पूरग्रस्त बांधवांच्या जीवनात पुन्हा प्रकाशमान दिवस यावेत,” अशा सदिच्छाही संस्थेमार्फत व्यक्त करण्यात आल्या.
Editer sunil thorat





