काळेपडळ तपास पथकाची धडक कारवाई, घरफोडी प्रकरणातील चोरटा अटकेत ; ९ लाख २२ हजारांचा मुद्देमाल जप्त…

तुळशीराम घुसाळकर
हडपसर (पुणे) : काळेपडळ तपास पथकाने घरफोडी करून पसार झालेल्या चोरट्याला जेरबंद करत मोठे यश मिळवले आहे. अटकेतील आरोपीकडून ९ लाख २२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या आरोपीचे नाव मुस्तफा शकील अन्सारी (वय ४१, रा. जवाहरगंज, कोंढवा, पुणे) असे आहे.
घरफोडी प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलीस अंमलदारांनी घटनास्थळी फरशी व गॅलरीवर रक्ताचे डाग पाहून तातडीने फॉरेन्सिक टीमला पाचारण केले. जमा केलेल्या रक्तनमुना तपासासोबत परिसरातील ७२ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पडताळणी करण्यात आली. यामध्ये आरोपी मोबाईलवर बोलताना आढळून आला. पुढील तांत्रिक विश्लेषणातून तो कोंढवा परिसरात असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यावर चौकशीदरम्यान चोरीतील सोन्याचे दागिने, दुचाकी व मोबाईल फोन असा एकूण ९ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
ही धडक कारवाई पोलीस उपायुक्त परिमंडळ-५, पुणे शहर राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे अमर काळंगे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली.
या यशस्वी कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस हवालदार प्रविण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतिक लाहीगुडे, विशाल ठोंबरे, शाहीद शेख, लक्ष्मण काळे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, प्रदीप बेडीस्कर, महादेव शिंदे आदींचा मोलाचा सहभाग राहिला.
Editer sunil thorat




