फुकट जेवण न दिल्याने झोमॅटो डिलिव्हरी बॉयला मारहाण करून लुटले ; अवघ्या २४ तासांत तिघांना अटक…

तुळशीराम घुसाळकर
कदमवाकवस्ती (पुणे) : झोमॅटो डिलिव्हरी बॉयला फुकट जेवण न दिल्याने तिघांनी लाथाबुक्क्यांनी व दांडक्यांनी मारहाण करत मोबाईल व पार्सल असा २० हजार ४४७ रुपयांचा मुद्देमाल लुटल्याची घटना लोणी काळभोर येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी जलद कारवाई करत अवघ्या २४ तासांच्या आत तिघांना अटक केली आहे.
फिर्यादी स्वप्निल ईश्वर काळे (वय ३७, रा. श्री स्वामी समर्थ रेसिडेन्सी, मांजरी गोपाळपट्टी, हडपसर, पुणे) यांच्या तक्रारीवरून स्वप्रिन भागवत बंगने (वय २४, रा. भगवा चौक, सिद्राम मळा, लोणी काळभोर), रोहन अजिनाथ लोंढे (वय २६, रा. पाषाणकर बाग, लोणी काळभोर) व अजित शहाजी चांदणे (वय २१, रा. गायकवाड वस्ती, धनलक्ष्मी पार्क, कदमवाकवस्ती) यांना अटक करण्यात आली आहे.
ही घटना १ ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील झुडीओ शॉपसमोर घडली. फिर्यादी स्वप्निल काळे हे दोन वर्षांपासून झोमॅटो कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी लोणी काळभोर भागात डिलिव्हरीसाठी पोहोचल्यावर आरोपींनी ऑर्डर कॅन्सल करण्यास भाग पाडले. मात्र त्यानंतरही “जेवण आम्हालाच द्या” अशी धमकी देत त्यांना मारहाण करण्यात आली व ४४७ रुपयांचे पार्सल व विव्हो मोबाईल असा २०,४४७ रुपयांचा मुद्देमाल हिसकावून नेला.
फिर्यादीनंतर तातडीने गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी राबवलेल्या तपास मोहिमेत आरोपींना अटक करून त्यांच्याकडून मोबाईल जप्त करण्यात आला आहे. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी पुणे शहर पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस उपनिरीक्षक उदय काळभोर, रत्नदीप बिराजदार, हवालदार गणेश सातपुते, अण्णा माने, रामहरी वणवे, तसेच पोलीस कर्मचारी राहुल कर्डिले, प्रवीण धडस, योगेश पाटील, शैलेश कुदळे, सुरज कुंभार, चक्रधर शिरगिरे, सचिन सोनवणे, बाजीराव वीर व त्यांच्या पथकाने केली.
Editer sunil thorat



