ऊसाच्या एफआरपीशी साखरेची एमएसपी लिंक केल्यास साखर उद्योगास स्थैर्य : हर्षवर्धन पाटील…
साखरेची एमएसपी किमान ₹40 करावी, अशी मागणी...

संपादक डॉ गजानन टिंगरे
इंदापूर, (दि. 3 ऑक्टोबर) : गेल्या सहा वर्षांत ऊसाच्या एफ.आर.पी.मध्ये तब्बल ₹ 650 प्रति टन इतकी वाढ झाली आहे, मात्र त्याच काळात साखरेच्या एम.एस.पी.मध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. त्यामुळे ऊसाची एफ.आर.पी., साखरेचा एम.एस.पी., इथेनॉल व को-जनचे भाव हे एकमेकांशी लिंक केल्यास साखर उद्योगाला स्थैर्य प्राप्त होईल व शेतकऱ्यांना अधिक दर देणे शक्य होईल, असे प्रतिपादन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.
मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीतील निर्णयांची माहिती त्यांनी इंदापूर येथे पत्रकारांशी बोलताना दिली. राज्य सरकारने केंद्राकडे याबाबत प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
पाटील म्हणाले, “सध्या साखरेची एम.एस.पी. ₹ 3100 असून व्यापारी ₹ 39-40 दराने खरेदी करतात, तर दुकानदार ग्राहकांना ₹41-42 दराने विक्री करतात. हा दर ग्राहकांनी स्वीकारलेला असल्याने केंद्र सरकारने साखरेची एम.एस.पी. किमान ₹40 निश्चित करावी.”
यावेळी त्यांनी ऊस तोडणी मजुरांच्या हितासाठी गोपीनाथ मुंडे महामंडळात साठलेले कोट्यवधी रुपये विमा, आश्रमशाळा, साखर शाळा व वसतिगृह योजनांवर खर्च करण्याची मागणी केली. तसेच सहवीज प्रकल्पांना मागील वर्षाप्रमाणेच यंदाही प्रति युनिट ₹1.50 अनुदान द्यावे, अशी शिफारसही बैठकीत झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, साखर कारखाने 1 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय अतिवृष्टी व दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर योग्य असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
सहवीज प्रकल्पांमुळे राज्याला मोठा फायदा…
“राज्यातील 130 कारखाने सध्या वीज निर्मितीत गुंतलेले आहेत. माझ्या सहकारमंत्रीपदाच्या काळात तयार केलेल्या धोरणाचा याचा मोठा फायदा झाला आहे. राज्यात वीज निर्मितीची क्षमता 2710 मे.वॅटपर्यंत पोहोचली असून, मागील हंगामात 300 कोटी युनिट वीज निर्यात होऊन ₹2000 कोटींचे उत्पन्न झाले. त्याचा थेट लाभ शेतकऱ्यांना मिळत आहे,” असेही हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.
Editer Sunil thorat



