शासनाने कितीही प्रयत्न केले तरी प्रकल्प पूर्ण होवू देणार नाही ; पुरंदर शेतकरी..

पुणे : पुरंदर तालुक्यातील छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पूर्णपणे कंबर कसली आहे. कोणत्याही परिस्थितीत प्रकल्प करण्याचा शासनाने चंग बांधला आहे. त्यादृय्ष्टीने तालुक्यातील गायरान शासनाच्या जमिनीची माहिती संकलित करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सप्टेंबर पर्यंत भूमी अधिग्रहण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे एकीकडे शासन प्रकल्प पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असतानाच ज्या परिसरात प्रकल्प उभारला जाणार आहे, त्या भागातील शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. शासनाने कितीही प्रयत्न केले तरी प्रकल्प पूर्ण होवू देणार नाही असा निर्धार शेतकर्यांनी केला असून याचाच भाग म्हणून गुरुवारी (दि. २३) प्रकल्प अंतर्गत गावातील शेतकरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. शासनाच्या विरोधात शेतकर्यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला असून प्रकल्प बाधित जास्तीत जास्त शेतकर्यांनी मोठ्या संख्येने येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विमानतळ प्रकल्प अंतर्गत येणार्या वनपुरी, उदाचीवादी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी आणि पारगाव येथील शेतकर्यांनी या प्रकल्पास सुरुवातीपासूनच मोठ्या प्रमाणात विरोध केला आहे. यासाठी शेतकर्यांनी वेळोवेळी मोर्चे, निवेदने देवून शासनाला आपला विरोध दर्शविला आहे.
पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, आमदार विजय शिवतारे यांच्या घरावर अंत्ययात्रा, तहसील कार्यालय येथे मोर्चा काढून शासनाचा वेळोवेळी निषेध केला आहे. प्रकल्प जाहीर झाल्यापासून सर्व मुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना शेतकर्यांनी भूमिका सांगितली आहे.



