आदेश झुगारत ‘रिव्हरव्ह्यू सिटी’कडून बेकायदेशीर काम ; चित्तरंजन गायकवाड यांचा आरोप…

तुळशीराम घुसाळकर
कदमवाकवस्ती (पुणे) : भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने स्पष्टपणे कामबंदीचे आदेश दिले असतानाही रिव्हरव्ह्यू सिटी प्रशासनाने पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग (क्र. ६५) सेवा रस्त्यालगत पाईपलाईनचे काम सुरू ठेवले आहे. प्राधिकरणाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत रिव्हरव्ह्यू सिटीने प्रशासनालाच थेट आव्हान दिल्याचे चित्र समोर आले आहे.
कदमवाकवस्ती येथील सेवा रस्त्यावर पिण्याच्या पाण्याची लाईन टाकण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र नियमबाह्य काम व रस्ता पूर्ववत न केल्यामुळे याआधी दोन तरुण जखमी झाले. त्यानंतर प्राधिकरणाने काम थांबवण्याचे आदेश देत तात्पुरती परवानगी रद्द केली आणि दंडही ठोठावला.
तरीदेखील रिव्हरव्ह्यू सिटीने आज पुन्हा खोदकाम सुरू केले असून भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, माजी सरपंच चित्तरंजन गायकवाड यांनी वारजे येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयात जाब विचारल्यावरच प्रशासन जागे झाले आणि कामबंदीचे आदेश काढले. पण हे आदेश पायदळी तुडवत रिव्हरव्ह्यू सिटीने मनमानी सुरूच ठेवली आहे.
गायकवाड यांनी स्पष्ट केले की,
“काम बंद करण्याचे आदेश असूनही रिव्हरव्ह्यू सिटी खोदकाम करत आहे. कायदा धाब्यावर बसवून नागरिकांच्या जिवाशी खेळ केला जात आहे. एखादी दुर्घटना घडल्यास त्याला रिव्हरव्ह्यू सिटी प्रशासन जबाबदार असेल.”
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कामास परवानगी दिली. परंतु काही महिन्यापासून महाराष्ट्र राज्य इन्फास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनीला ते टेंडर दिले असल्याचे सांगितले जात आहे. परंतु याबाबत पुढे येऊन ना जबाबदारी घेत ना प्रतिक्रिया देत अशात आता शासन व प्राधिकरणाने आदेश झुगारत काम करणाऱ्या रिव्हरव्ह्यू सिटी प्रशासनावर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Editer sunil thorat



