हडपसर परिसरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विकासकामांची पाहणी…
“अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वाहतूक कोंडी सोडवा” ; उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : पुणे शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहनांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी ही गंभीर समस्या बनली असून त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज आहे, असे निर्देश त्यांनी दिले.
आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खराडी ते केशवनगर पुलाच्या कामाची पाहणी केली. तसेच मुंढवा चौक आणि हडपसर गाडीतळ परिसरातील वाढत्या वाहतुकीची स्थिती प्रत्यक्ष पाहून संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. या वेळी आमदार चेतन तुपे, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते.
पुलामुळे मोठ्या प्रमाणात सुटणार कोंडी…
या वेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, “खराडी ते केशवनगर पुलाचे काम गतीने व दर्जेदार साहित्य वापरून पूर्ण करावे. या पुलाच्या उभारणीमुळे चंदननगर, केशवनगर आणि खराडी परिसरातील नागरिकांना होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळणार असून, प्रवासाचा वेळही मोठ्या प्रमाणात वाचेल.”
नागरिकांच्या मागण्यांना प्राधान्य…
पाहणीदरम्यान स्थानिक नागरिकांनी पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरुस्ती, पथदिवे, कायदा व सुव्यवस्था तसेच बससेवा सुधारणा या संदर्भात मागण्या केल्या. या सर्व मागण्यांचा गांभीर्याने विचार करून प्राधान्याने मार्ग काढला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
वाहतूक कोंडीवर उपाययोजना…
मुंढवा चौक व हडपसर गाडीतळ परिसरात होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महानगरपालिका, पोलीस प्रशासन, पीएमपीएल आणि लोकप्रतिनिधींनी मिळून संयुक्त बैठक घेण्याचे निर्देश अजित पवार यांनी दिले. या बैठकीतून व्यवहार्य उपाययोजना निश्चित करून अंमलात आणण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी अजित पवार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना शहरातील रस्ते रुंद करण्याच्या कामांना गती द्यावी, वाहतुकीसाठी स्मार्ट सिग्नल्स व तांत्रिक साधनांचा वापर वाढवावा, अशा सूचना देखील दिल्या.
Editer sunil thorat






